सोशल नेटवर्किंग साईट्सवर ‘टिपी’ करताय.. जरा सावध! कारण आता कॅम्पस इंटरव्ह्य़ूमधून विद्यार्थ्यांची निवड करताना कंपन्या विद्यार्थ्यांची ‘सोशल नेटवर्किंग’ साईट्सवरील प्रोफाईल्सही पाहात आहेत, त्याद्वारे तुमच्याबद्दल मतंही बनवत आहेत.
कंपनीमध्ये मनुष्यबळाची भरती करताना कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास विभागाकडून मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची वेगवेगळ्या ‘सोशल नेटवर्किंग’ साईट्सवरील प्रोफाईल्स पाहण्याचा ट्रेंड सध्या दिसत आहे. विशेषत: महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या कॅम्पस इन्टरव्ह्य़ूजमध्ये कंपन्यांकडून विद्यार्थी सोशल नेटवर्किंग साईट्सवर आहेत का, याची माहिती आवर्जून घेतली जात आहे. विद्यार्थी सोशल नेटवर्किंग साईट्सचा किती आणि कशासाठी वापर करतात, किती वेळा वापर करतात, सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ते कशाप्रकारे आणि कोणत्या विषयांवर व्यक्त होतात, या साईट्सच्या वापराबाबत विद्यार्थ्यांची मते काय आहेत, अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यात कंपन्यांना रस असल्याचे दिसून येते आहे. विद्यार्थ्यांकडून भरून घेतल्या जाणाऱ्या अर्जामध्येही कोणत्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर आहात? त्याचा वापर कशासाठी करता? ब्लॉगवर कोणते विषय हाताळता? अनोळखी व्यक्तींशी मैत्री करता का? अशा प्रकारचे प्रश्नही काही कंपन्या विचारत आहेत.
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी आणि सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून वाढलेल्या गुन्हेगारीच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रोफाईल्स पाहिली जात असल्याचे निरीक्षण महाविद्यालयांच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या प्रमुखांनी नोंदवले आहे. विद्यार्थ्यांनी कसा फोटो अपलोड केला आहे, ते कुणाशी बोलतात, त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये कोण आहे, कोणत्या विषयांवर बोलतात याची पाहणी अधिकारी करत आहेत.

‘व्यक्तिमत्त्व व सामाजिक जाणिवा समजतात’
पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. संदीप मेश्राम यांनी सांगितले, ‘‘फेसबुकपेक्षाही लिंक्ड इन किंवा ट्विटरचा वापर विद्यार्थी कसा करत आहेत, ते पाहण्याकडे कंपन्यांचा कल आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, सामाजिक जाणिवेचा अंदाज त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरील प्रोफाईल्सच्या माध्यमातून येतो. अधिकारीही टेक सॅव्ही असल्यामुळे विद्यार्थ्यांची माहिती घेण्याचे एक माध्यम म्हणून साईट्सवरील प्रोफाईल्स पाहिली जात आहेत.’’