वर्षभरात १८,४३३ कोटींच्या गुंतवणुकीचे करार

पुणे : राज्य सरकारकडून विविध १२ कंपन्यांशी सामंजस्य करार मंगळवारी करण्यात आले, त्यातील एका कंपनीने १४२ कोटींची नवी गुंतवणूक पुणे जिल्ह्यात केली आहे. रसायन क्षेत्रात ही गुंतवणूक करण्यात आली आहे. गेल्याच वर्षी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’अंतर्गत देशातील आणि परदेशातील आघाडीच्या विविध कंपन्यांशी तीन टप्प्यांत सामंजस्य करार करण्यात आले होते. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात तब्बल १८,३०० कोटींची गुंतवणूक आली आहे.

करोनाकाळात आणि त्यानंतरही उत्पादन, माहिती तंत्रज्ञानाबरोबरच, डाटा सेंटर, लॉजिस्टिक पार्क यामध्येही पुण्यात गुंतवणूक होत आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, दोन वर्तुळाकार रस्त्यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे, मेट्रो यांसारखे प्रकल्प होत असून मनुष्यबळाची उपलब्धता, मुबलक जागा आणि मुंबई व नवी मुंबईपासून जवळ असल्याने पुण्याला उद्योगांची पसंती मिळत आहे. गेल्या वर्षभरात पुण्यात तब्बल १८,४३३ कोटींची गुंतवणूक विविध कंपन्यांकडून जिल्ह्याच्या विविध भागांत करण्यात आली आहे.

दरम्यान, ‘डागा ग्लोबल केमिकल’ या कंपनीने कुरकुंभ येथे गुंतवणूक करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. याद्वारे या कंपनीकडून रसायन क्षेत्रात १४२ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून ३९० रोजगार नव्याने निर्माण होणार आहेत. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला.

गेल्या वर्षी जून महिन्यात अॅसेंडास, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी, हेंगली, ग्रेट वॉल मोटर्स आणि हिरानंदानी लॉजिस्टिक पार्क या सात कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले.