पुणे : बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात कंपनी सचिव (सीएस) अभ्यासक्रमाचे महत्त्व टिकून राहण्यासाठी आता अभ्यासक्रम दर पाच वर्षांऐवजी तीन वर्षांनी बदलण्याचे प्रस्तावित आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाला पाठवण्यात आला असून, कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट (सीएसईईटी) ही प्रवेश परीक्षा आता वर्षातून तीन वेळा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियाच्या (आयसीएसआय) अध्यक्षपदी पुण्याचे कंपनी सचिव पवन चांडक, तर उपाध्यक्षपदी द्वारकानाथ चेनूर यांची निवड झाली. त्यांचा एक वर्ष कार्यकाळ असणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत चांडक यांनी अभ्यासक्रम, परीक्षेतील बदलांबाबतची माहिती दिली. आयसीएसआयच्या पुणे विभागाचे अध्यक्ष विशाल साळुंके, उपाध्यक्ष सोहल ठाकूर, सचिव निखिल कारवा, सदस्य विशाल पाटील, समीर सिद्धेश्वर, पश्चिम विभागीय समितीचे सदस्य संजय पटारे या वेळी उपस्थित होते.

चांडक म्हणाले, ‘कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्टमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. हे बदल जून २०२६च्या सत्रापासून लागू केले जाणार आहेत. तसेच प्रवेश परीक्षा वर्षातून तीन वेळा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेतील बदलांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनात्मक स्पष्टता, विश्लेषणात्मक क्षमता, संवादकौशल्ये आणि व्यावहारिक समज यांचा अधिक प्रभावी विकास होणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाबाबत ऑनलाइन मार्गदर्शन वर्गही उपलब्ध आहेत. आतापर्यंत दर पाच वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्यात येत होता. मात्र, तंत्रज्ञानाचा प्रचंड वेग पाहता पाच वर्षांपेक्षा तीन वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मंत्रालयाला त्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. नवा अभ्यासक्रम जून २०२७मध्ये लागू करण्यात येणार आहे. मात्र, त्या पुढील अभ्यासक्रम तीन वर्षांनी बदलण्यात येईल. त्याशिवाय आयसीएसआयतर्फे कंपनी सचिव अभ्यासक्रमासह मेरिटाइम रेग्युलेशन्स अँड कम्प्लायन्स मॅनेजमेंज या विषयातील पूर्ण वेळाचा एमबीए अभ्यासक्रम, काही प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत.

आयसीएसआयतर्फे विद्यार्थी आणि सदस्यांच्या क्षमतावृद्धीसाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याशिवाय हवामान बदल प्रशासनाबाबतची तत्त्वे, नवउद्यमी आणि लघुउद्योजकांना मदत, तंटा निवारणाच्या पर्यायी व्यवस्थेचा (एडीआर) विस्तार याबाबतही पुढाकार घेतला जाणार असल्याचे चांडक यांनी नमूद केले.

सहावीपासूनच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कॉर्पोरेट क्षेत्रात कंपनी सचिव हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. या क्षेत्रात व्यावसायिक आणि नोकरीच्या अनेक स्तरावर संधी उपलब्ध आहेत. कंपनी सचिव हा अत्यंत कमी खर्चात करता येणारा अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती, प्लेसमेंट अशा सुविधाही दिल्या जातात. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे वळण्यासाठी राज्य मंडळ, विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत.

तसेच अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली जाते. मात्र, आता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कंपनी सचिव अभ्यासक्रमाबाबत शाळांमध्ये जाऊन माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे वळण्याचा विचार सुरू करावा, असेही चांडक यांनी सांगितले.