रूपी बँकेसारख्या अडचणीत आलेल्या मोठय़ा सहकारी बँकेचा पूर्ण तोटा सहन करून संपूर्ण बँकेचे विलीनीकरण करून घेणे कोणत्याही एका सहकारी बँकेस शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन अशा बँकेच्या शाखा विलीनीकरणाबाबत दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स् फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी मांडलेल्या प्रस्तावाला राज्यातील व राज्याबाहेरील सक्षम बँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, शाखांच्या विलीनीकरणाची तयारी दर्शविली आहे.
शाखांचे विलीनीकरण करण्याचा प्रयोग रूपी बँकेबाबत राबविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशन, रूपी बँक व सहकार आयुक्त यांनी शुक्रवारी संयुक्तरीत्या बोलविलेल्या सभेत रूपीच्या शाखांचे विलीनीकरणाबाबत बँकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सहकार आयुक्त मधुकर चौधरी, अप्पर आयुक्त दिनेश ओऊळकर, रूपीचे प्रशासक डॉ. संजय भोसले, दुसरे प्रशासक व फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्यासह नॅशनल फेडरेशन, कॉसमॉस बँक, ठाणे जनता, कल्याण जनता, जनता सहकारी बँक, इचलकरंजी जनता, जळगाव जनता यांसह नागपूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई व गुजरात येथील सहा बँकांचे प्रतिनिधी सभेला उपस्थित होते.
शाखा विलीनीकरणाच्या संकल्पनेबाबत अनास्कर यांनी सभेत माहिती दिली. ते म्हणाले, ठेवीदार संरक्षण विमा महामंडळाच्या मदतीने होणाऱ्या शाखा विलीनीकरणामुळे ठेवीदारांची सर्व रक्कम सुरक्षित राहण्याबरोबरच शाखा विलीनीकरण करून घेणाऱ्या बँकांनाही अनेक फायदे होणार आहेत. अशा विलीनीकरणासंदर्भात गुजरात. छत्तीसगड, पंजाब, दिल्ली यांसह राज्यातील अनेक बँकांनी सहमती दर्शविली आहे. या बँकांचे लेखी प्रस्ताव आल्यानंतर त्यांच्या संमतीने शाखा विलीनीकरणाचा अंतिम प्रस्ताव रिझव्र्ह बँकेकडे पाठविण्यात येणार आहे.