पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘हरित सेतू’ प्रकल्पासाठी विशेष ब्रँड डिझाइन स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे तीन लाख, दोन लाख व एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यासाठीची नोंदणी सोमवारपासून सुरू करण्यात आली.

असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. यामधील सहभागींसाठी १४ जून रोजी कार्यशाळा होणार आहे. अंतिम सादरीकरणासाठी २७ जून २०२५ पर्यंत मुदत आहे. www.adiawards.org यावरून डिझाइनचे सादरीकरण करावे लागणार आहे. त्याचा निकाल १० जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे.

‘हरित सेतू’ उपक्रमामार्फत महापालिका पादचारी केंद्रित रस्ते, सुसंगत वाहनतळ व्यवस्था, मजबूत सार्वजनिक वाहतूक प्रणाली आणि सुरक्षित चौक यावर भर देत आहे. ही संकल्पना महापालिकेच्या कार्यक्षम, समावेशक आणि शाश्वत वाहतूक प्रणालीच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग आहे. शहराने आता केवळ औद्योगिक शहर म्हणून ओळख मर्यादित न ठेवता एक प्रगत आणि नागरिकांच्या पसंतीचे शहर म्हणून ओळख निर्माण केली आहे. ‘हरित सेतू’सारख्या उपक्रमांद्वारे वैज्ञानिक नियोजन आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा संगम घडवण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरी पायाभूत प्रकल्पांसाठी ब्रँडिंग आणि डिझाइन प्रक्रियेमध्ये सार्वजनिक सहभाग वाढवणे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. ‘हरित सेतू’ हा शहरात शाश्वत वाहतुकीस चालना देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.