पुणे : नगर रस्त्यावर येरवडा भागातील शास्त्रीनगर चौक परिसरात बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाल्याची तक्रार समाज माध्यमांवर करण्यात आली. शास्त्रीनगर चौकातील सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, असे त्यात म्हटले आहे.
नगर रस्ता परिसरातील शास्त्रीनगर चौक गजबजलेला आहे. येथे कायमच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागतात. मध्यंतरी यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांनी केले. त्या वेळी वाहतुकीचा वेग वाढल्याचाही दावा करण्यात आला होता. मात्र, पावसाळा सुरू झाल्यापासून पुन्हा या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.
पावसामुळे वाहतुकीचा वेग संथ होतो. पावसामुळे मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत होते. त्यातच बुधवारी सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाल्याने कोंडीत भर पडल्याची तक्रार चालकांनी केली.
दरम्यान, वाहतूक पोलीस आणि महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक सुधारणा करण्यासाठी वाहनचालकांना वळण घेण्यासाठी तयार केलेले अनावश्यक ‘पंक्चर’ बंद केले आहेत.