पुणे : आषाढी वारी दरम्यान पुण्यात जी-२० परिषद होणार आहे. या निमित्ताने पुण्यात दाखल होणाऱ्या परदेशी पाहुण्यांना वारीच्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यासाठी वारीबद्दल क्युआर कोड आणि घडीपुस्तिकेच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. क्युआर कोडमुळे एका क्लिकवर वारीसंबंधी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.
जी-२० परिषदेच्या पुण्यात १२ ते १४ जून या कालावधीत ‘डिजीटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’ बैठका पार पडणार आहेत. या निमित्ताने पुण्यात दाखल होणाऱ्या परदेशांतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना वारीबाबत क्युआर कोडच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. त्यामध्ये वारीची परंपरा, वारीचा मार्ग, मुक्कामाची ठिकाणे, वारकऱ्यांची करण्यात येणारी सोय, पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, प्रशासनाचे नियोजन आदींबाबत तपशील असणार आहे.
हेही वाचा >>>…. तर महाविद्यालयांची संलग्नता रद्द ! काय आहे उच्च शिक्षण विभागाचा निर्णय?
पाहुण्यांच्या जेवणाच्यावेळी महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीची देखील ओळख करून देण्यात येणार आहे. तसेच पुण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे, येथील खाद्यसंस्कृती, स्मार्ट सिटी, स्वच्छ पुणे, आदी वैविध्यांची माहिती देण्यात येणार आहे. परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना विमानतळ ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पुण्याची वैशिष्ट्ये आणि क्षमता ठळकपणे दिसतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक, महत्वाची वारसा ठिकाणे, शैक्षणिक संकुल आदी ठिकाणी प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. बैठकीच्या निमित्ताने शहर स्वच्छता, महत्वाचे चौक, मार्गांचे सुशोभीकरण आणि रात्री विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.