पैसे नागरिकांचे, काम सार्वजनिक यंत्रणेचे आणि संकल्पना, सौजन्य फलक नगरसेवकांच्या नावाचे कशाला, अशी विचारणा करत आम आदमी पक्षाने संकल्पना फलकांना विरोध दर्शविला आहे. जनतेच्या कराच्या पैशांतून सर्वपक्षीय नगरसेवकांनी हजारो ठिकाणी सौजन्य आणि संकल्पना फलक उभारले आहेत. ते तातडीने काढून टाकावेत आणि काढून टाकण्याचा खर्च नगरसेवकांकडून वसूल करावा, अशी मागणी आपचे राज्य संघटक, पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार आणि प्रवक्ता डॉ. अभिजीत मोरे यांनी केली आहे.

जनतेच्या कराच्या पैशातून महापालिका प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सुविधा, सेवा, बांधकामे, रस्ते, उड्डाणपूल, बगीचे, उद्याने, शौचालये, स्मशानभूमी, समाजमंदिर, मंडई, अग्निशमन केंद्र या ठिकाणांबरोबरच खासगी आस्थापना, निवासी इमारतीबाहेर नगरसेवकांच्या नावे सौजन्य किंवा संकल्पना फलक लागले आहेत. त्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे.
नगरसेवकांच्या नावाचे फलक लावणे बेकायदा आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. तसेच सार्वजनिक मालकीवर केलेले अतिक्रमण आणि विनामूल्य प्रसिद्धीचा प्रकार आहे. आगामी निवडणुकीच्या आचारसंहिता काळात फलक झाकण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार आहेत, असे कुंभार यांनी सांगितले.
फलक काढण्याचा खर्च नगरसेवकांकडून वसूल करावा. निवडणूक आचारसंहिता काळात फलक झाकण्याचा खर्च महापालिकेला करावा लागल्यास तोही नगरसेवकांकडून वसूल करावा.नगरसेवक विरोध अथवा टाळाटाळ करत असतील तर खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात ग्राह्य धरावा यासाठी महापालिका आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करावा, अशी मागणी कुंभार यांनी केली आहे.