आता मोबाईल अप्लिकेशन्स बनवताना वेगवेगळ्या संगणक प्रणालींसाठी ‘अॅप’ चे वेगळे ‘व्हर्जन’ बनवावे लागणार नाही. ‘एचटीएमएल ५’ या नवीन संगणकीय भाषेचा वापर करून कोणत्याही संगणक प्रणालीवर चालू शकतील अशी अॅप्स बनवता येणार आहेत. यामुळे या भाषेत बनवली गेलेली अॅप्स सर्व मोबाईल हँडसेटवर चालू शकणार आहेत.
‘डब्ल्यू थ्री सी’ (वर्ल्ड वाईड वेब कॉन्सोर्शियम) या संगणकतज्ज्ञांच्या संघटनेतर्फे ही भाषा विकसित करण्यात आली आहे. याबद्दल संगणक व्यावसायिकांना माहिती देण्यासाठी बुधवारी संघटनेतर्फे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डब्ल्यूथ्रीसीच्या एचटीएमएल विभागाचे प्रमुख मायकल स्मिथ, जागतिक व्यापार विकास सल्लागार जे. अॅलन बर्ड, सीडॅकचे महासंचालक रजत मुना, कार्यकारी संचालक हेमंत दरबारी या वेळी उपस्थित होते.
जे. अॅलन बर्ड म्हणाले, ‘‘एचटीएमएल ५ हा एक ‘ओपन वेब प्लॅटफॉर्म’ आहे. संगणकीय प्रोग्रॅम लिहिताना अनेक अडचणी येतात. या संगणकीय भाषेत वेगवेगळ्या भाषांची वैशिष्टय़े असल्यामुळे कोडिंगमधील अडचणींचा सामना करण्यासाठी ही भाषा अधिक अद्ययावत ठरू शकेल. आगामी काळात या भाषेचा अभ्यास असणे संगणकतज्ज्ञांसाठी जागतिक पातळीवर महत्त्वाचा ठरेल.’’



