पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर रायगडावरील शिवसमाधीबाबत परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. शिवसमाधी आणि शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्याची प्रेरणा देणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्यावर जातीय द्वेषातून आरोप करून त्यांचे श्रेय नाकारणे यासारखे दुर्दैव नाही, अशी प्रतिक्रिया श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने व्यक्त केली आहे. तर, रायगडावरील शिवसमाधी छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधली असून या समाधीचा शोध लावून महात्मा फुले यांनी शिवजयंतीला सुरुवात केली, अशी भूमिका इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मांडली.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी मंगळवारी शिवसमाधीसंदर्भात माहिती दिली. बलकवडे म्हणाले, १८८३ मध्ये जेम्स डग्लस नावाच्या एका इतिहासप्रेमी इंग्रजाने शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरवस्थेविषयी ब्रिटिश सरकारवर टीका केली. त्यावेळी मराठी माणसाच्या मनात असलेली अस्वस्थता पाहून लोकमान्य टिळकांनी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला.
जनजागृती करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवजन्मोत्सव व पुण्यतिथी सोहळा करण्याची योजना आखून श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना केली. याच मंडळाच्या माध्यमातून शिवसमाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंडळाचे माजी अध्यक्ष जगदीश कदम आणि लोकमान्य टिळकांचे खापर पणतू कुणाल टिळक या वेळी उपस्थित होते.
रायगडावरील शिवसमाधी छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधली. या समाधीचा शोध महात्मा फुले यांनी लावला असून त्यांनीच शिवजयंतीला सुरुवात केली, अशी भूमिका इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मांडली. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ९०८ ओळींचा पोवाडा लिहिला. केवळ पोवाडा लिहून ते थांबले नाहीत, तर त्यांनी या पोवाडय़ाचे गायन केले होते, असे कोकाटे यांनी सांगितले. राष्ट्र सेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष लहू लांडगे, सतीश काळे आणि सुहास नाईक या वेळी उपस्थित होते.