लोणावळा/ पुणे : स्वातंत्र्य दिनाला जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे वर्षांविहारासाठी पुणे-मुंबईतील पर्यटकांनी लोणावळा, खंडाळा परिसरात गर्दी केली असून मोठय़ा संख्येने पर्यटक मोटारीतून दाखल झाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी कोंडी झाली. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडल्याने मुंबई-पुणे हा विलंबाचा प्रवास शनिवारी हजारोंनी अनुभवला.

शनिवार, रविवार, स्वातंत्र्य दिन तसेच पारशी नववर्षांची सुट्टी जोडून आल्याने पर्यटक मोठय़ा संख्येने लोणावळा, खंडाळा परिसरात दाखल झाले आहेत. पुण्याच्या तुलनेत वर्षांविहारासाठी मुंबईकर मोठय़ा संख्येने दाखल झाले. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक कमालीची संथ झाल्याने मोटारींच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. घाटक्षेत्रात अनेक वाहने बंद पडल्याने कोंडीत भर पडली.

खंडाळा महामार्ग पोलिसांनी कोंडी सोडविण्यासाठी खंडाळा बोगदा येथून मुंबईकडे जाणारी मार्गिका पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी खुली केली, तरी वाहनांच्या रांगा पाच ते सहा किलोमीटपर्यंत लागल्या. लोणावळा शहरात वाहतूक कोंडी झाली होती. भुशी धरण, ‘लायन्स पॉइंट’कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटारींच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

द्रुतगती मार्गावर कोंडी झाल्याने वाहनचालक लोणावळा शहरातून जात असल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कार्ला लेणी, भाजे लेणी, पवना धरण परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ सीताराम डुबल आणि कर्मचाऱ्यांनी कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, मोठय़ा संख्येने मोटारचालक लोणावळा शहरात दाखल झाल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना चालणेदेखील अवघड झाले आहे.

वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले..

वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती आणि वाहनांचा प्रचंड मोठा लोंढा यामुळे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या महामार्गावर प्रचंड संख्येने वाहने अडकून पडली. मुंगीच्या गतीने सुरू राहिलेल्या या वाहतुकीमुळे मुंबई ते पुणे हे केवळ दोनशे किमीचे अंतर पार करण्यासाठी सुमारे बारा तासांचा अवधी लागत होता. जलदगती महामार्गावर कोठेही पोलिसांचा मागमूस नव्हता, त्यामुळे वाहतूक नियंत्रित होऊ शकत नव्हती. अनेकांनी द्रुतगती महामार्गाऐवजी जुन्या मुंबई पुणे मार्गावरून जाण्याचा निर्णय घेतला. 

खालापूरपासून बोरघाट चढताना मुंबईकडून लोणावळय़ाकडे मोठय़ा संख्येने मोटारी रस्त्यावर आल्या. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. घाट क्षेत्रात काही ठिकाणी वाहने बंद पडली. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांनी वाहनांना एक मार्गिका उपलब्ध करून दिली होती. पण, मोठय़ा संख्येने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.

– राजन सस्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस

हुल्लडबाजांवर कारवाई ..

पुढील तीन दिवस लोणावळा शहर पर्यटकांची मोठी गर्दी होणार असल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गड-किल्ल्यांवर जाणाऱ्या वाटा निसरडय़ा झाल्या आहेत. वर्षांविहारासाठी आलेल्या नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. हुल्लडबाजांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.