पुणे : भारतीय जनता पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची नियुक्ती झाल्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी या दोघांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र पंकजा मुंडे यांच्या मंत्रींमंडळातील समावेशाबाबत पाटील यांनी बोलणे टाळले. चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांनी शुभेच्या दिल्या. या दोघांना मोठे यश मिळू दे. भाजप क्रमांक एकचा राजकीय पक्ष आहे. आगामी निवडणुकीत या दोघांच्या नेतृत्वाखाली तो कायम राहील, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारात माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देत पंकजा मुंडे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. मी मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्रीमंडळात सर्वांना स्थान देता येत नाही. मला मंत्रीपद देण्याएवढी माझी पात्रता नसेल, कदाचित माझ्यापेक्षा जास्त पात्रतेचे लोक असतील, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली होती. यासंदर्भात पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी बोलणे टाळले. पंकजा मुंडे यांची केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराआधी विधानपरिषद निवडणुकीतही नाव चर्चेत होते. मात्र दोन्ही वेळा त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी आहे.