पीएमपीचा पदभार स्वीकारताच डॉ. श्रीकर परदेशी यांनी ठाम कृती योजना सुरू केल्यामुळे पीएमपी सेवेत काही सकारात्मक बदल तातडीने दिसत असून, या बदलांबाबत डॉ. परदेशी यांचे अभिनंदनही केले जात आहे. सातत्याने टीकेचा विषय ठरत असलेल्या पीएमपीकडून चांगली सेवा देण्यासाठी डॉ. परदेशी यांनी काही तातडीचे निर्णय घेतल्यामुळे गेल्या दहा दिवसांत तब्बल एकशेदहा गाडय़ा मार्गावर आल्या असून उत्पन्नातही वाढ सुरू झाली आहे.
डॉ. परदेशी यांनी पीएमपीची नेमकी स्थिती समजून घेऊन त्याबाबतच्या आवश्यक कृती योजना तातडीने हाती घेतल्या आहेत. पीएमपीच्या एकूण ताफ्यातील फक्त पंचेचाळीस टक्के गाडय़ाच मार्गावर धावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अधिकाधिक गाडय़ा मार्गावर आणण्यासंबंधीचे आदेश जारी केले आणि त्याचा योग्य तो परिणाम होऊन एकशेदहा गाडय़ा मार्गावर येऊ शकल्या. डॉ. परदेशी यांनी सुरू केलेल्या या ठाम कृती योजनेबद्दल पीएमपी प्रवासी मंच तसेच अन्य स्वयंसेवी संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले असून आणखीही काही सूचना संस्थांनी केल्या आहेत. जास्तीतजास्त गाडय़ा मार्गावर आणताना प्रत्येक गाडीतून प्रत्येक दिवशी किती प्रवाशांची वाहतूक झाली पाहिजे याचेही उद्दिष्ट ठरवून दिले जावे. प्रतिदिन प्रतिगाडी एक हजार प्रवासी हे उद्दिष्ट असावे, अशी मागणी प्रवासी मंचने केली आहे. काही छोटी उद्दिष्टे, मोठी उपलब्धी अशा स्वरूपातील आमच्या सूचना असून त्याबाबतही कार्यवाही करावी, अशी विनंती प्रवासी मंचने केली आहे.
सध्याचा गाडय़ांचा ताफा पूर्णपणे वाहतुकीसाठी वापरून प्रवासी वाढीत सातत्य आल्याशिवाय नवीन गाडय़ांची खरेदी करू नये, भावी नियोजनात गाडय़ांची आवश्यकता आहे असे लक्षात आले तरच नव्या गाडय़ांची खरेदी करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या दरवाढीनंतर पासच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसल्याचे सांगितले जात असले तरी पासचे दर अवैधरीत्या वाढवण्यात आले आहेत. दैनिक, मासिक व अन्य पासच्या दरांत वाढ करण्यात आलेली नाही. मात्र एकाच मार्गासाठी जो मासिक पास (रूट पास) काढला जातो, त्या पासचे दर वाढले आहेत. या छुप्या दरवाढीचा फटका हजारो विद्यार्थी, नोकरदारांना बसत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. ही दरवाढ रद्द करून दैनिक पास सत्तर रुपयांऐवजी पन्नास रुपये करावा, अशी मागणी करून पास स्वस्त केल्यास प्रवासीसंख्या निश्चितपणे वाढेल याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. कमी गर्दीच्या वेळी तिकीट दरात पन्नास टक्के सवलत द्यावी, अशीही प्रवासी मंचची मागणी आहे.
पीएमपीकडून याही अपेक्षा
– प्रवासीसंख्येचे उद्दिष्टही निश्चित करा.
– नवीन गाडय़ा खरेदीची घाई नको.
– पासची छुपी दरवाढ रद्द करावी.
– दैनिक पासचा दर पन्नास रुपये करावा.