मुस्लिम आणि दलित समाजाला भडकावणे हाच काँग्रेसचा अजेंडा असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. ते गुरूवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळ आठवले यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मुस्लिम आणि दलित समाजाला भडकावणे हेच काँग्रेसचे काम आहे. खेड्यापाड्यात काँग्रेस पक्षामुळेच जातीयवाद टिकून राहिला आहे, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी आठवले यांनी संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना आम्हीच बदलून टाकू, असा इशाराही दिला. तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्यापेक्षा स्वत:ची ओंजळ बळकट करा, असा सल्लाही दिला. कार्यकर्ता म्हणून काम करा. नेता म्हणून काम केले तर समाज कधीच तुम्हाला नेता मानणार नाही. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून काम करा. नेतृत्वासाठी धडपड करू नका. लोकांनी तुम्हाला नेता म्हटले पाहीजे. तुम्ही स्वतःला नेता म्हटले तर लोक तुम्हाला नेता मानत नाही. त्यासाठी तुम्ही लोकांचा नेता बनण्याचा सल्ला त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

तसेच यावेळी रामदास आठवले यांनी दलित पॅन्थर चळवळीच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. रिपब्लिकन ऐक्यासाठी पॅन्थरची चळवळ बरखास्त करावी लागली. त्यावेळी अनेक पॅन्थर रडले. अखेर पॅन्थरची सोन्यासारखी चळवळ बरखास्त करावी लागली. त्यावेळी रिपब्लिकनांमध्ये असणारे ऐक्यही आता टिकले नसल्याची खंत आठवले यांनी व्यक्त केली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पँथर गौरव पुरस्काराचे वितरण रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात झाले. या कार्यक्रमाला युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी आमदार ए. टी. सावंत हेदेखील उपस्थित होते.