‘भ्रष्टाचारावर बोलणाऱ्या भाजपने लोकसभा निवडणुकांच्या काळात २३ हजार कोटी रुपयांच्या जाहिराती केल्या. त्यासाठी पैसा कुठून आणला?’ असा प्रश्न माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शर्मा आले होते. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घऊन भाजपवर जोरदार टीका केली.
या वेळी शर्मा म्हणाले, ‘भाजप दुसऱ्या पक्षांना घोटाळेबाज म्हणते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपने २३ हजार कोटी रुपयांच्या जाहिराती केल्या आहेत. या जाहिरातींसाठी भाजपकडे पैसे कुठून आले. भाजपचे सर्व नेते सध्या प्रचारासाठी खासगी हेलिकॉप्टर आणि विमानाने फिरत आहेत. भाजपमध्ये सध्या एकाधिकारशाही आहे. पक्ष व्यक्तिकेंद्रित झाल्यामुळे राज्यातील प्रचारासाठीही मोदींना पुढे केले जात आहे. सीमेवर गोळीबार सुरू असतानाही देशाचे पंतप्रधान राज्यातील निवडणुकांचा प्रचार करत आहेत.’
मोदींच्या अमेरिकेतील भाषणाबाबत शर्मा म्हणाले, ‘मोदी सरकार फक्त जाहिरातबाजी करत आहे. अमेरिकेतील मोदींचे भाषण हे तिकिट लावून ठेवण्यात आले होते. ते भाषण म्हणजे अमेरिकाभेटीचे यश म्हणता येणार नाही. मोदी सरकार यूपीए सरकारच्याच गोष्टी पुढे नेत आहेत.’
 मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे यश काय?
‘मोदींचा अमेरिका दौऱ्याचा गवगवा मोठा झाला. कतरिना कैफ किंवा सलमान खान जेवढय़ा वेळा कपडे बदलत नसतील, तेवढय़ा वेळा मोदींनी अमेरिका दौऱ्यात कपडे बदलले,’ असा शेरेबाजी शर्मा यांनी मोदी यांच्या दौऱ्यावर केली.