पुणे : ‘केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून व्यक्तींमध्ये, जाती-धर्मांमध्ये भेद निर्माण करून भांडणे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या वृत्तीपासून देशाला वाचविण्यासाठी काँग्रेसमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अंतर्गत हेवेदावे दूर ठेवत येणाऱ्या निवडणुकीत एकजुटीने काम करावे,’ असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या वतीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा-कर्तव्य-त्याग’ सप्ताहाचे उद्घाटन सपकाळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलास कदम, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण, माजी नगरसेवक अविनाश साळवे, अविनाश बागवे, लता राजगुरू, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे, स्वाती शिंदे या वेळी उपस्थित होत्या.

‘काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिले. या स्वातंत्र्याच्या माध्यमातून देशाने मोठी वाटचाल केली आहे. मात्र, आता सत्तेवर असलेल्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाती, धर्माच्या नावाखाली व्यक्तींमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग सुरू केला आहे’, असे सपकाळ म्हणाले. भाजपचे काम बुद्धिभेद करणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम त्यांना कवेत घेणे आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी कुठल्या आहेत, यावरून संघाने घाणेरडे राजकारण केले. गेली ३५ वर्षे सोनिया गांधी देशाच्या सून आहेत. त्यांनी पंतप्रधानपद नाकारून त्याग काय असतो, हे देशाला दाखवून दिले. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनीही पंतप्रधानपद नाकारले, असे सपकाळ म्हणाले.

काँग्रेस मुक्त नव्हे तर काँग्रेस युक्त भाजप

भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्ष संपविण्यासाठी ‘काँग्रेस मुक्त’ भारत अशी घोषणा केली होती. पण आता भाजपची स्थिती पाहता आणि त्यांच्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावर उपस्थिती पाहिली तरी भाजप आता काँग्रेस युक्त झाली आहे, असे दिसते. काँग्रेस हा विचार आहे. कोणाच्याही जाण्याने तो संपणार नाही, असेही सकपा‌ळ यांनी सांगितले. सत्तेची मस्ती काय असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार संतोष बांगर आहे. जेवढे त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. तेवढी पदके मिळाल्याच्या तोऱ्यात ते वागतात, असेही सपकाळ म्हणाले.

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा बाहुला

मतदानाला ४० तास शिल्लक असताना मतदान पुढे ढकलणे, मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय गोंध‌ळ, मतांची धांदल दिसून आली. हे निवडणूक आयोगाचे अपयश असून आयोग सत्ताधारी पक्षांच्या हातातील बाहुले झाले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.