काँग्रेसने ‘सेझ’च्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरच्या घशात घातल्या – माधव भंडारी

शेतकऱ्यांच्या हडप केलेल्या जमिनी सरकार ताब्यात घेईल, या भीतीने काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते भूसंपादन कायद्याला विरोध करत असून त्यांचा शेतकऱ्यांचा कळवळा खोटा आहे.

शेतकऱ्यांच्या हडप केलेल्या जमिनी सरकार ताब्यात घेईल, या भीतीने काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते भूसंपादन कायद्याला विरोध करत असून त्यांचा शेतकऱ्यांचा कळवळा खोटा आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी निगडित केला. ‘सेझ’च्या नावाखाली काँग्रेसने शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डर लॉबीच्या घशात घातल्या आणि आता काँग्रेसचे युवराज राहुल गांधी सर्वत्र गळा काढत आहेत, असेही ते म्हणाले.
प्राधिकरणातील सावरकर मंडळाच्या छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेत ‘भूसंपादन कायदा, समज-गैरसमज’ या विषयावरील व्याख्यानात भंडारी बोलत होते. अ‍ॅड. एस.बी. चांडक, उद्योजक एस. बी. पाटील, विनोद बन्सल व्यासपीठावर होते.
भंडारी म्हणाले, भूमी अधिग्रहण कायद्यावरून अपप्रचार सुरू आहे. अज्ञातवासातून बाहेर येताच राहुल गांधी यांनी आरडाओरडा चालवला आहे. काही कथित बुध्दिवाद्यांनी व माध्यमांनी त्यांची तळी उचलून धुराळा उडवल्याने गैरसमजात भर पडते आहे. काँग्रेसने ३०० सेझ केले, त्यासाठी मोठय़ा प्रमाणात जमीनींचे संपादन केले. मनमोहनसिंह, सोनिया गांधींनी शेतकऱ्यांचे हक्क नाकारणारे कायदे केले. त्यात बदल करण्याचा वटहुकूम मोदी सरकारने काढला. त्यामुळे राहुल गांधी यांचा आकांडतांडव अनाठायी आहे. दहा वर्षांत देशभरात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यास काँग्रेस जबाबदार आहेत. काँग्रेस सरकारने २००८ मध्ये कर्जमाफी केली. मात्र, आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढल्या. पॅकेजचे ‘ते’ पैसे कुठे गेले, हा संशोधनाचा विषय आहे. भूसंपादनाचे ६० वर्षांचे अनुभव वाईट आहेत. पुनर्वसन झाले नाही. विस्थापितांना मोबदला मिळाला नाही. या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, तेच गळा काढत आहेत. सत्ता जाताच अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसने लोकसभा व राज्यसभेतील चर्चेचा मार्ग स्वीकारावा अन्यथा समोरासमोर येऊन खरे-खोटे करावे. राज्यातील शहरीकरणाचा वेग सर्वाधिक असून ५१ टक्के लोकसंख्या शहरात आहे. ७० टक्के शेतकरी जमीन विकून टाकण्याच्या मानसिकतेत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे, याकडे भंडारी यांनी लक्ष वेधले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress ncp sez madhav bhandari builder lobby