काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार माजी खासदार तुकाराम रेगे पाटील व माजी आमदार मधु चव्हाण हे निरीक्षक म्हणून मंगळवारी पिंपरी-चिंचवडला येत आहेत. शहराध्यक्ष सचिन साठे तसेच माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या समर्थकांना ते स्वतंत्रपणे भेटणार आहेत. निरीक्षकांसमोर नेमके काय ‘सादरीकरण’ करायचे, यावरून दोन्हीकडून डावपेच सुरू आहेत.
आजी-माजी शहराध्यक्षांच्या वादामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी तसेच दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी या निरीक्षकांना पाठवले आहे. सकाळी ते पालिका मुख्यालयात काँग्रेसच्या दालनात भोईर समर्थकांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्यानंतर, चिंचवडगावातील शहर काँग्रेसच्या कार्यालयात साठे समर्थकांशी संवाद साधणार आहेत. दोन्ही गटांशी चर्चा केल्यानंतर त्याचा अहवाल ते प्रदेशाध्यक्षांना देणार आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. निरीक्षकांमुळे शहर काँग्रेसमधील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत.