कार्यक्रमांचं नियोजन.. ते पार पाडण्यासाठी सुरू असलेली लगबग.. कुणाची नाराजी, कुणाचे मानापमान यावर हळू आवाजातील कुजबूज.. इमारतीच्या मागे टाकलेल्या मंडपामध्ये सतत उकळणारं चहाचं आधण आणि त्याचवेळी एखाद्या खोलीत गप्पा आणि चर्चाना आलेली उकळी.. या सगळ्या गजबजाटात एक कोपरा शांत. महिला विभागाचा.. हे चित्र आहे काँग्रेस भवनचं. येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक काँग्रेस भवनमधील धावपळ ही अधिकच वाढली आहे.
एरवी तसं शांत असणारं काँग्रेस भवन सध्या कार्यकर्त्यांच्या वर्दळीने गजबजून गेले आहे. एरवी नेते, दादा, भाई असणारे सगळेच आता निवडणुकांच्या तोंडावर पक्ष कार्यालयात हजेरी लावून ‘कार्यकर्ते’ बनू पाहात आहेत. आमदार, नगरसेवक, प्रमुख, कट्टर कार्यकर्ते, संघटनेची पोरं ते जमवलेले कार्यकर्ते अशा सगळ्या स्तरांनी कार्यालय गजबजले आहे. काँग्रेस भवन हे बहुतेक कार्यकर्त्यांचे दुसरे घर बनले आहे. रोजच्या प्रचार सभा, पदयात्रा यांचे नियोजन, केलेल्या नियोजनानुसार सर्व होते आहे का याचा आढावा, कार्यक्रमात आयत्या वेळी झालेले बदल या सगळ्याचा आढावा कार्यकर्ते घेत असतात. सकाळच्या वेळी थोडे शांत असणारे काँग्रेस भवन दुपापर्यंत भरून जाते ते रात्री अगदी दोन वाजेपर्यंत जागे असते.
उमेदवाराची पदयात्रा किंवा सभा ज्या भागात असेल, त्या भागाची जबाबदारी असलेला कार्यकर्ता हा त्या दिवशी ‘राजा’ असतो. आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्याची धावपळ सुरू असते. झेंडे किती लागतील, किती लोक येणार, पुरेशी गर्दी जमणार का, येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था या सर्वाचा आढावा घेताना न झालेल्या ठिकाणी त्यांची स्वत:च पळापळ सुरू असते. क्वचितप्रसंगी नियोजनावरून एखादा वादही रंगतो. दुसरीकडे एखाद्या घोळक्याच्या गप्पा रंगात आलेल्या असतात. जुने-जाणते कार्यकर्ते असलेल्या घोळक्यांमध्ये जुन्या निवडणुका, भाषणे यांच्या किश्यांची उजळणी सुरू असते. एखाद्या कोपऱ्यात अमुक एक भाई, भाऊ, दादा. यांच्या नाराजीची कुजबूज सुरू असते. अमुक कालच्या रॅलीत दिसला नाही. या वेळी अमक्यांची बोलती बंद झाली आहे नाही. त्याने कसा लोचा केला. अमक्यामुळे या भागात जरा अडचण आहे; अशा चर्चा कुणी ऐकत नाही अशा समजुतीत रंगलेल्या असतात. अगदी जुन्या कार्यकर्त्यांपासून ते विद्यार्थी संघटनेच्या नवख्या कार्यकर्त्यांना या चर्चामध्ये आवर्जून रस असतो. फक्त आपल्याच पक्षाच्या नाही, तर इतर पक्षातल्या घडामोडींचीही चर्चा असते. ती मात्र उघडपणे!
या सगळ्यामध्ये आवर्जून लक्षात येणारा भाग म्हणजे इमारतीच्या मागे तात्पुरत्या स्वरूपात सुरू झालेला भटारखाना! शेकडो कार्यकर्त्यांचा चहा, नाश्ता, जेवण इथे बनत असते. दुपारच्या वेळी आवर्जून फक्त जेवायला येणारेही काही कार्यकर्ते आहेत. येणाऱ्या प्रत्येकाला घरी आलेल्या पाहुण्याला आग्रह करावा, तसा चहाचा आग्रह होत असतो. गजबजलेल्या काँग्रेस भवनमध्ये एक कोपरा मात्र नेहमीच शांत दिसतो तो म्हणजे महिला कार्यकर्त्यांचा कक्ष! अभावानेच कधीतरी महिला कार्यकर्त्यां काँग्रेस भवनमध्ये हजेरी लावतात. एखादा मोठा नेता येणार असेल तरच कधीतरी महिला कार्यकर्त्यांची हजेरी दिसते. एरवी रॅली, प्रचार सभांमध्ये दिसणाऱ्या महिला कार्यकर्त्यां काँग्रेस भवनमध्ये मात्र दिसत नाहीत.