पुणे : वारजे येथे प्रस्तावित ७०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयाला काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. गरीब रुग्णांना अल्पदराने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली खासगी वैद्यकीय व्यावसायिकाच्या घशात कोट्यवधी रुपयांचा आरक्षित भूखंड घालण्याचा प्रकार महापालिकेकडून सुरू आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

महापालिका सभागृह अस्तित्वात नसताना आयुक्तांनी प्रशासक पदाचा गैरवापर करत हा प्रस्ताव दामटण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला. वारजे येथील या प्रस्तावित रुग्णालयाच्या उभारणीला फेब्रुवारी २०२२ मध्ये स्थायी समिती आणि मुख्य सभेने मान्यता दिली होती. वारजे येथील दहा हजार चौरस फुटांची जागा त्यासाठी महापालिकेकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.“डिझाइन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट, ट्रान्सफर’ या तत्त्वावर खासगी संस्था रुग्णालय उभारणार असून त्यासाठी नेदरलॅण्ड येथील राबो बँकेकडून दीड टक्के व्याजदराने महापालिका ३५० कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे.

रुग्णालय उभारल्यानंतर कर्जाचे हप्ते संबंधित खासगी संस्थेकडून भरले जाणार असून नागरिकांना या रुग्णालयात माफक दराने आरोग्य सुविधा मिळतील, असा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. मात्र कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचा सर्वसामान्य पुणेकरांना कोणताही फायदा होणार नसल्याने या प्रस्तावाला विरोध होत असून काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यासंदर्भात आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकाला कोट्यवधी रुपयांचा भूखंड महापालिका स्वखर्चाने विकसित करून देणार आहे. हा प्रकार चुकीचा असून अल्प दरात आरोग्य सुविधा देण्याच्या नावाखाली पुणेकरांच्या अहिताचा निर्णय घेतला जात आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.