पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस संघटन पातळीवर कमकुवत आहे, याची आम्हाला जाणीव आहे. संघटनेच्या पुनर्बांधणीसाठी बूथ स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत ‘संघटन सृजन अभियान’ राबविण्यात येत आहे. शहराध्यक्षपदासाठी ३५ जणांनी मुलाखती दिल्याचे काँग्रेसचे शहराचे निरीक्षक, हिमाचल प्रदेशचे आमदार विनोद सुलतानपुरी यांनी सांगितले.
आमदार जयंत आजगावकर, राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे, निरीक्षक भानुदास माळी, प्रदेश सचिव बाबू नायर, मयूर जयस्वाल यावेळी उपस्थित होते. सुलतानपुरी म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष संघटनेच्या पुनर्बांधणीसाठी बूथ स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत ‘संघटन सृजन अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व पदांसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटून वैयक्तिकरित्या संवाद साधला आहे.
सर्वांनी आपली मते निसंकोचपणे व्यक्त केली. या अगोदर मोठ्या निर्णयासाठी येथील कार्यकर्त्यांना मुंबईत जायला लागत होते. परंतु आता स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून येथेच निर्णय होतील. शहराध्यक्ष पदासाठी ३५ लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. ब्लॉक अध्यक्ष तसेच इतर पदांसाठी देखील इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. या अभियानाचा अहवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सादर करण्यात येणार आहे’.
‘अभियानाच्या पहिला टप्प्यात जिल्हा व ब्लॉक स्तरावर अध्यक्षांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, एनएसयुआय, अनुसूचित जाती विभाग, अनुसूचित जमाती विभाग, इतर मागासवर्गीय विभाग, अल्पसंख्याक विभाग, भटक्या विमुक्त जमाती विभाग, सोशल मीडिया विभाग पदांसाठी निरीक्षक शिफारस करतील’, असे निरीक्षक माळी यांनी सांगितले.
चार महिन्यांपासून काँग्रेस शहराध्यक्षाविना
महापालिका निवडणुकीची धामधूम असताना डिसेंबर महिन्यात तत्कालीन शहराध्यक्ष कैलास कदम यांनी राजीनामा दिला होता. तेव्हापासून पक्ष संघटना शहराध्यक्षविना आहे. चार महिन्यांनी नवीन शहराध्यक्ष नियुक्तीसाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत.
