काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथील काँग्रेस भवनात शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. राज्य विधानसभेची निवडणूक हा विषय या वेळी चर्चेत होता. मात्र त्यापेक्षा अधिक चर्चा पुण्यातील निवडणुकीबाबत झाली.
शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना ‘गुरुवारी सायंकाळी पाच वाजता काँग्रेस भवनात या’ असे निरोप दुपारी देण्यात आले होते. पृथ्वीराज चव्हाण दुपारी पुण्यात आले होते. पुण्यात सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेला भेट देऊन ते काँग्रेस भवन येथे पोहोचले. प्रभारी शहराध्यक्ष संजय बालगुडे, उपमहापौर आबा बागूल, आमदार विनायक निम्हण, दीप्ती चवधरी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड तसेच काँग्रेसचे अभय छाजेड, चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, रोहित टिळक, उमेश कंधारे, श्रीरंग चव्हाण हे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार या वेळी उपस्थित होते. चव्हाण यांनी या वेळी प्रत्येक मतदारसंघाची माहिती घेतली. एकत्रित माहिती घेतल्यानंतर त्यांनी काही उमेदवारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली.
निवडणुकीसंबंधी सुरू झालेल्या चर्चेत या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी तक्रारीही केल्या. पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांनी प्रचारात भाग घेतला नाही, तसेच प्रदेश काँग्रेसच्या जाहीरनाम्याची प्रत कोणत्याच मतदारसंघात मिळाली नाही, अशी तक्रार उमेदवारांनी या वेळी दिली. काँग्रेसचे प्रदेश वा केंद्रीय स्तरावरील नेते पुण्यात प्रचाराला आले नाहीत, अशीही तक्रार या वेळी करण्यात आली.