पुणे : शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा घाट घालण्यात येत आहे. त्यासाठीच बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्यात येणार आहे, असा आरोप करत काँग्रेसने बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध दर्शविला आहे. त्या निषेधार्थ काँग्रेसकडून बुधवारी बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे, अजित दरेकर, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, महिला अध्यक्षा पूजा आनंद या वेळी उपस्थित होते.

बागवे म्हणाले,की बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून ५४ वर्षांपूर्वी बालगंधर्व उभारण्यात आले.  शहरात एकूण १४ नाटय़गृहे असून फक्त ३ नाटय़गृहे सुरू आहेत. बालगंधर्वची मूळ वास्तू पाडून तेथे व्यापारी संकुल उभारण्याचा  प्रशासनाचा डाव आहे. त्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.

महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा प्रस्ताव प्रशासनापुढे ठेवला.  पुणेकरांशी चर्चा न करता किंवा त्यांची भावना समजून न घेता घाईगडबडीत हा प्रस्ताव ठेवण्याचे काय कारण आहे, हे आजपर्यंत पुणेकरांना समजले नाही.  पुण्याच्या सौंदर्यावर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस विरोध करेल, असेही त्यांनी सांगितले. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. पुण्यनगरीतील अतिशय मोक्याच्या ठिकाणी ही वास्तू आहे. या वास्तूला पाडून त्याठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात आल्यास बालगंधर्वचे वैभव संपुष्टात येईल. सत्तेचा गैरवापर करून बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडण्याचा प्रकार पुणेकरांच्या भावना दुखविणारा आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.