स्त्रीने प्रतिकूल परिस्थितीतही पुढे जाणारी, कधीही मागे न वळणारी व निर्धारित लक्ष्य ठेवून समुद्राला जाऊन मिळणारी नदी व्हावे, असे मत व्याख्यात्या शैलजा सांगळे यांनी पिंपरीत मांडले. महिला सर्वच क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जातील व यशस्वी होतील. तेव्हा, सत्काराची गरज उरणार नाही. कारण, सर्वच स्त्रिया सक्षम झालेल्या असतील, तो सुदिन लवकर यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पिंपरी युवा काँग्रेसच्या वतीने सांगळे यांच्यासह लेखिका मेधा शिंपी, पत्रकार अश्विवी सातव, मीनाक्षी गुरव यांना ‘सोनिया स्त्री सन्मान’ पुरस्काराने गौरवले, तेव्हा त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे होते. कैलास कदम, ज्योती भारती, कविचंद भाट, अशोक मोरे, निगार बारस्कर, मनोज कांबळे, राजू गोलांडे, संयोजक नरेंद्र बनसोडे उपस्थित होते.
सांगळे म्हणाल्या, पुरुषांसारखे वागून नव्हे तर स्वत:च्या क्षमतांचा विकास म्हणजे महिला सक्षमीकरण होय. तो विकास करण्याची संधी आपणच घेतली पाहिजे. त्यासाठी स्वंयप्रेरणा महत्त्वाची आहे. ती असल्यास काहीही शक्य आहे. मात्र, तेथेच आपली गाडी अडते. आपण दुसऱ्यावर विसंबून राहतो. आत्मविश्वास आणि घरचे पाठबळ नसल्यास मार्गात अडथळे येतात. ते दूर करणे महत्त्वाचे आहे. महिलांनी स्वत:ला सक्षम करणे महत्त्वाचे आहे. राजमाता जिजाऊपासून अनेक कर्तृत्ववान महिलांनी ते दाखवून दिले आहे. पाठबळ नसतानाही स्वयंप्रेरणेने अनेक महिलांनी मोठे काम केले. सर्वच क्षेत्रात महिला कार्य करू शकतात, त्यासाठी आत्मविश्वास हवा. सूत्रसंचालन संजय दातार यांनी केले.
‘सत्तेत येताच भाजपची भाषा बदलली’
सत्तेत येताच भाजप नेत्यांची भाषा बदलली, अशी टीका शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली. काही धर्मवेडे लोक जनतेला वेठीस धरत आहेत, त्यातून फुटीरतेचा धोका आहे. एकजुटीने असे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष अशी सन्मानाची पदे काँग्रेसने महिलांना दिली आहे. महिलांमध्ये कर्तृत्व असते, त्यांना संधीची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करावी, असे ते म्हणाले.