काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना केंद्रातील मोदी सरकारसह भाजपावर विविध मुद्द्य्यांवरून जोरदार टीका केली. “भाजपाचा जो मुख्य अजेंडा आहे, आपण पाहिलं की केंद्रामधील भाजपाच्या सरकारने २०१९ पासून २०२१ काळात ज्या पद्धतीने करोना संसर्गाची वाढ झाल्यानंतरही, ज्या काही सुरक्षित व्यवस्था निर्माण करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाहीत.” असा आरोप पटोले यांनी यावेळी केला.

तसेच, “साध्या लसीकरणात देखील दलाली खाण्याची व्यवस्था केली आणि आपण पाहिलं असेल की मार्च महिन्यापासून ते कालपर्यंत ज्याप्रमाणात करोना रूग्णांचे मृत्यू झाले. अनेकांच्या घरचे कर्ते लोकं गेले, अनेकजण आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले. तरी देखील सेलिब्रशन करण्याचा भाजपाने जो नवीन गोरखधंदा सुरू केला. ऑल इस वेल… अशा पद्धतीने जर पंतप्रधान देशाला संबोधित करत असतील. लोकांच्या मृत्यूवर तांडव करणं, उत्सव साजरा करणं याच्या पेक्षा दुसरं दुर्भाग्य ठरू शकत नाही. महागाई बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्न हे आज आमच्या मूळावर रूजले गेलेले आहेत. देश ५० वर्षे मागे गेलेला आहे. एकीकडे चीन आपल्यावर हल्ला करतोय, अरुणाचल प्रदेशचा काही भाग त्यांनी घेतला. अनेक भागात चीन प्रवेश करतोय, त्यावर एक शब्दही बोलला जात नाही. देशातल्या अंतर्गत प्रश्नांबाबत भाजपा सरकारला काही देणंघेणं नाही.” असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.

याचबरोबर, “सीबीआयच्या चौकशा लावून लोकांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न, केंद्रात बसलेल्या भाजपा सरकारने जो सुरू केलेला आहे. त्याला जशास तसं उत्तर देण्याचं महाविकासआघाडीचं आता ठरलेलं आहे. त्यामुळे काल अजित पवार यांनी जी भूमिका मांडली आमची सगळ्यांची त्यांना सहमती आहे.” असं नाना पटोलेंनी यावेळी स्पष्टे केलं.

भाजपाकडून हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याचे प्रय़त्न सुरू –

“२१ हजार कोटींचं जे ड्रग्ज मिळालं. नियमाप्रमाणे त्या पोर्टचा जो मालक आहे त्यावर कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी होती. देशामध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणावर ड्रग येणं. यासाठी कुणाचे साटेलोटे आहे, कोणत त्यांचा पार्टनर आहे, कोण त्याच्या पाठीशी आहे? एवढं मोठं ड्रग या देशात येतयं, तर या देशातील तरूणाईंला ड्रग्जमध्ये डुबवण्याचा प्रयत्न केंद्रामधील भाजपाच्या सरकारचा आणि त्यांच्या मूठभर उद्योगपतींकडून या देशात जर अशी मोहीम चालवली जात असेल, तर काँग्रेस जशास तसं उत्तर देईल. या देशातील तरुणाईस अशा पद्धतीने बरबाद होताना काँग्रेस कधीही पाहणार नाही. म्हणून भाजपाने आर्यन प्रकरणात जो गोरखधंदा सुरू केलेला आहे, मुस्लीम व हिंदू वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे. खरंतर देशातील नागरिकांनी भाजपाचा खरा चेहरा ओळखून घेतलेला आहे. त्यामुळे देशात हिंदू-मुस्लीम वादही होणार नाही. कारण, ही पोटाची आणि देशाची लढाई, देशाच्या संविधानिक व्यवस्थेची लढाई हे आता नागरिकांनी समजलेली आहे. त्यामुळे भाजपाने कितीही सत्तेचा दुरुपयोग करून, सत्तेची गुरमी त्यांना आलेली आहे ती त्यांची गुरमी जनता उतरवल्या शिवाय राहणार नाही.” असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलून दाखवलं.

मागील सात-आठ वर्षात देश ५० वर्षे मागे गेला –

“ आज जे काही मूळ प्रश्न आहेत, त्यावरून जनतेचं कसं लक्ष दुसरीकडे वळवायचं हा प्रयत्न केला जात आहे. मग कधी सावरकर, सरदार वल्लभाई पटेल आणले जातील. कोण स्वातंत्र्यवीर होते? कुणी ६० रुपये पेंशन घेतली हा सगळा इतिहास जनतेला माहिती आहे. त्यामुळे कोण स्वातंत्र्यवीर होतं की नव्हतं? हा भाग आज नाही. आपला देश याच्यापलीकडे चालला गेलेला आहे. महासत्ता बनण्याचं स्वप्न देशाने पाहिलेलं होतं. पण ज्या पद्धतीने तुम्ही ५० वर्षे या देशाला मागील सात-आठ वर्षात मागे आणलं. याचा हिशोब द्या आणि या हिशोबासाठी तुम्ही नागरिकशास्त्र शिकवा की भुगोल शिकवा, हे सगळे प्रश्न विचारण्याची तुमची आता लायकी राहिलेली नाही. अशी परिस्थिती आज देशामध्ये आहे. काँग्रेस हा कुठल्याही द्वेषाचं राजकारण न करणारा पक्ष आहे. सगळ्यां घेऊन चालणारा सगळ्यांच्या विचारांना घेऊन चालणारा हा पक्ष आहे. त्यामुळे आमचं प्रेम कुणावर आहे आणि राग कुणावर आहे हा भागच नाही. आम्हाला देश महत्वाचा आहे त्यामुळे काँग्रेस आपल्या भूमिकेत स्पष्ट आहे.” असंही यावेळी नाना पटोले यांनी सांगितलं.