राज्य वखार महामंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद

राहुल खळदकर

पुणे : आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या साक्षीदार असलेल्या कोकणातील ऐतिहासिक वखारींचे संवर्धन करण्याची महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात येत आहे. सागरी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्यासाठी वखारींचे संवर्धन करून तेथे ऐतिहासिक व्यापार माहितीचे संग्रहालय निर्माण केले जाईल. काळाच्या ओघात पडझड झालेल्या वखारींना या योजनेमुळे गतवैभव मिळणार आहे.

भारतात सागरी महामार्गाद्वारे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी, तसेच डच आणि पोर्तुगीजांनी कोकणातील राजापूर, वेंगुर्ला भागात किनारपट्टीलगत वखारी बांधल्या होत्या. काळाच्या ओघात या वखारींची पडझड झाली. कोकणातील ऐतिहासिक वखारी आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याच्या साक्षीदार आहेत. या वखारींचे संवर्धन करण्यासाठी राजापूर, वेंगुर्ले येथील इतिहासप्रेमी, अभ्यासकांनी वेळोवेळी शासनाच्या विविध विभागांकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर  पुणे जिल्ह्य़ातील जुन्नरमधील सह्य़ाद्री गिरिभ्रमण संस्थेने कोकणातील वखारींचे संवर्धन व्हावे, यासाठी राज्य वखार महामंडळाकडे मागणी केली होती. वखार महामंडळाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी महामंडळाच्या सामाजिक दायित्व निधीद्वारे वखारींचे संवर्धन करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

राज्य वखार महामंडळाकडून राज्यात शेतीमालाची साठवणूक करण्यासाठी गोदामे (वखार) बांघण्यात आली आहेत. कोकणातील ऐतिहासिक वखारींची झालेली पडझड आम्ही वखार महामंडळाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच ऐतिहासिक वखारींचे संवर्धन करणात यावे, अशी मागणी केली. याबाबत वखार महामंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, असे सह्य़ाद्री गिरीभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ १९५७ पासून कार्यरत आहे. महामंडळाने अन्नधान्य साठवणुकीसाठी दोनशेपेक्षा अधिक ठिकाणी ११०० गोदामे बांधली आहेत. कोकणातील वखारींचा पुरातत्त्व, पर्यटन आणि सांस्कृतिक संबंध आहे.

राज्य शासनाने हे तीन विभाग आणि वखार महामंडळाशी समन्वय साधून वखारींच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा. त्या ठिकाणी सागरी आंतराष्ट्रीय व्यापाराविषयी माहिती देणाऱ्या संग्रहालयाची निर्मिती करावी. या संग्रहालयाच्या माध्यमातून नव्या पिढीसह पर्यटकांना ऐतिहासिक वखारींची माहिती उपलब्ध होईल, असे खत्री यांनी सांगितले.

कोकणातील वखारींच्या संवर्धनाबाबत सह्य़ाद्री गिरिभ्रमण संस्थेने लक्ष वेधले आहे. किनारपट्टीलगत असलेल्या वखारी ऐतिहासिक वारसा आहेत. वखारींच्या संवर्धनासाठी विविध विभागांबरोबर समन्वय साधून कार्यवाही क रू. ऐतिहासिक वखारींच्या संवर्धनासाठी मंडळाच्या सामाजिक दायित्व निधीद्वारे आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.

– दीपक तावरे, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ

 

वेंगुर्ले येथील ऐतिहासिक डच वखार राज्य संरक्षित स्मारक आहे. डच वखार मोडकळीस आली आहे. राजापूर, वेंगुर्ले भागातील वखारींचा ऐतिहासिक वारसा संवर्धित करण्याची गरज आहे.

    – विलास वहाणे, सहाय्यक संचालक, राज्य पुरातत्व विभाग