केंद्रातील सध्याचे सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अभिप्रेत कार्यक्रम राबवित आहे. त्यांनी घटनेमध्ये बदल करण्याचाही प्रयत्न सुरू केला असल्याने आता संविधान बचाव हेच परिवर्तनवादी आणि पुरोगामी चळवळींचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी शनिवारी व्यक्त केले. मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘मुस्लीम समाजासमोरील आव्हाने’ या विषयावर आयोजित दोन दिवसांच्या चर्चाससत्रामध्ये डॉ. बाबा आढाव होते. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, इंडियन सेक्युलर फोरमचे एल. एस. हर्देनिया, ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस, आरोग्य सेनेचे प्रमुख डॉ. अभिजित वैद्य, अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे माजी अध्यक्ष जी. ए. उगले यामध्ये सहभागी झाले होते. मंडळाचे अध्यक्ष हुसेन जमादार, कार्याध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा सायरा मुलाणी, प्रा. दिलावर शेख आणि प्रा. जमीर शेख या वेळी उपस्थित होते. परिवर्तनाविषयी सारेच बोलतात. पण, प्रत्यक्षामध्ये कृती करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात नाहीत याकडे लक्ष वेधून बाबा आढाव म्हणाले, विषमतेविरुद्धच्या लढय़ामध्ये दैनंदिन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना पर्याय देता आला नाही. जनसामान्यांशी संवाद करण्याकडेही दुर्लक्ष झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांना पर्याय देण्याबरोबरच सामान्यांमधील आत्मविश्वास जागविणे महत्त्वाचे आहे. सामान्य मुस्लिमांच्या मनातील भीती आणि ताण दूर करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. स्त्रीमुक्ती चळवळीच्या माध्यमातून महिला लोकसभेमध्ये काम करीत असताना मुस्लीम महिलेचा पडदा मात्र, दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत आहे. हिंदूू राष्ट्र निर्मितीचा प्रयोग भारतामध्ये सुरू आहे. सरकारच्या विरोधात उभे ठाकून शोषित आणि पीडितांना न्याय मिळवून दिला पाहिजे. मुस्लिमांच्या मनातील भयाची भावना दूर करीत त्यांच्यातील जिहादविषयीचे गैरसमज दूर करणेही आवश्यक असल्याचे भाई वैद्य यांनी सांगितले. सत्ता धर्माच्या हाती असू नयेदेशाची सत्ता कोणत्याही धर्माच्या हाती असू नये. धर्मनिरपेक्षतेविना लोकशाही अपुरी असल्याचे मत एल. एस. हर्देनिया यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी भारताची धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवली. नेहरू या भूमिकेवर ठाम राहिले नसते तर, भारताची अवस्था पाकिस्तानपेक्षाही भयंकर झाली असती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.