पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मूळ प्रकल्पात बदल होऊन अतिरिक्त दोन मजले आणि वाहनतळासाठी एक अतिरिक्त तळमजला बांधण्यात येणार असल्याने बांधकाम अद्यापही सुरू असल्याचे सांगत पणनमंत्री जयकुमार रावल यांनी इमारतीच्या बांधकामाला विलंब होत असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.
गुलटेकडी, मार्केटयार्ड येथे २०१६ मध्ये ११६ कोटी रुपये खर्च करून फूल बाजारात अकरा मजली इमारत उभारण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, या इमारतीचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. या संदर्भात वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी हा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. त्या संदर्भात बोलताना मंत्री रावल यांनी ही अप्रत्यक्ष कबुली दिली.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मूळ प्रकल्पात व्यापाऱ्यांच्या मागणीवरून बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अतिरिक्त दोन मजले आणि वाहनतळासाठी (पार्किंग) एक अतिरिक्त तळमजला बांधण्यात येणार आहे. बांधकाम प्रकल्पात हा बदल झाल्याने इमारत उभारणीचे काम अद्यापही सुरू आहे. इमारतीच्या गाळ्यांची उंची वाढविणे आणि गाळ्यांची संंख्या २५२ वरून ४३७ करण्यात आली आहे. उदवाहकाच्या (लिफ्ट) संख्येतही वाढ करण्यात आली असून, मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणेची योजना आदीमुळे खर्चात वाढ झाली आहे. खर्च ५४ कोटींवरून ११६ कोटींपर्यंत पोहोचला आहे. मात्र, बांधकामाला विलंब हा खर्चात वाढीमुळे झालेला नाही. इमारतीच्या बांधकामाची पाहणी जानेवारी महिन्यात करण्यात आली होती. त्या वेळी उर्वरित काम शंभर दिवसांत पूर्ण करण्याची सूचना केली होती. मात्र, इमारत उभारणीचे काम सुरू असल्याने कोणावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही, असे रावल यांनी सांगितले.