टँकरच्या धडकेत एका बांधकाम कंपनीतील व्यवस्थापकाचा मृत्यु झाल्याची घटना बाह्यवळण मार्गावरील वडगाव पूल परिसरात घडली. याप्रकरणी टँकरचालकाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. युवराज शंकर चव्हाण (वय ६५ रा. देशमुख नगर, शिवणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांच्या मुलगा नाथसिंह युवराज चव्हाण (वय २४) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टँकर चालक भगवान पांडुरंग क्षीरसागर (वय ४८, रा. माळेवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> दारु पिताना झालेल्या वादातून मेहुण्याला भोसकले, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, युवराज चव्हाण हे बिबवेवाडी येथील एका बांधकाम कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक (प्रोजेक्ट मॅनेजर)म्हणून काम करत होते. मंगळवारी (१८ सप्टेंबर) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ते कामावरुन घरी निघाले होते. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव पुलावर मुंबईकडे निघालेल्या टँकरने दुचाकीस्वार चव्हाण यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. अवजड वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना घडतात.