पावसाचे पाणी अडविण्यासाठी वन विभागाद्वारे निर्मिती

पुणे : पावसाळ्यामध्ये उतारावरून येणाऱ्या पाण्याच्या लोंढय़ाला अडविण्यासाठी वन विभागातर्फे तळजाई टेकडीवर बंधारे (चेक डॅम) बांधण्यात आले आहेत. टेकडीच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत चाळीस बंधारे आणि चर खणण्यात आले असून पावसाचे पाणी वेगवेगळ्या टप्प्यांवर अडवले जाणार आहे. त्यामुळे थेट सोसायटीपर्यंत येणाऱ्या पाण्याच्या लोंढय़ांपासून सुटका झाल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

तळजाई टेकडीच्या पायथ्याला गेल्या काही वर्षांत वसाहती वाढल्या आहेत. पावसाळ्यामध्ये दरवर्षी टेकडीवरचे पाणी उताराच्या दिशेने वेगाने वाहत येते. या पाण्याचे व्यवस्थापन केल्यास सोसायटय़ांमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना पाण्याला रोखता येऊ शकेल आणि  पाणी घरांमध्ये घुसण्याची शक्यता टाळता येईल , अशी मागणी स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे केली होती. दोन वर्षांपूर्वी आंबील ओढय़ाला पूर आला त्या वेळी टेकडीवरून वाहत असलेल्या पाण्याचे लोंढेही त्यास कारणीभूत ठरले होते, असे स्थानिकांचे मत आहे. अतिवृष्टी आणि पुराचा फटका अनुभवलेल्या नागरिकांनी बंधाऱ्यांसाठी वन विभागाकडे पाठपुरावा केला होता.

या परिस्थितीचा विचार करूनच वन विभागाने पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला. टेकडीच्या उतारावर वेगवेगळ्या ठिकाणी मे महिन्यापासून काम सुरू होते. उतारालगत चाळीस बंधारे बांधले आहेत. टेकडीच्या माथ्यापासून पहिल्या टप्प्यात चर आणि दुसऱ्या टप्प्यात बंधारे केले आहेत. हे सर्व पाणी वन तळ्यामध्ये साठविण्यात येणार आहे. जलव्यवस्थापनाअंतर्गत टेकडीवर आणि पायथ्याला दोन तळी बांधली आहेत.

पावसाचे पाणी उताराकडे येताना बरोबर माती आणि दगड धोंडे घेऊन येणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे. पायथ्याला केलेल्या  वन तळ्यामुळे टेकडीवरील पाण्याने येणारा पुराचा धोका टाळता येणार आहे. स्थानिकांचे या उपक्रमात सहकार्य मिळते आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी दीपक पवार यांनी दिली.

टेकडीवरील बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. पावसाने अजून जोर धरलेला नाही. त्यामुळे चरांमध्ये पाणी साठायला सुरुवात झालेली नाही. ऑगस्टनंतर प्रत्यक्षात बदल दिसू लागतील.

दीपक पवार, वन परिक्षेत्र अधिकारी