प्राच्यविद्या अभ्यासाचा ध्यास घेत शतकभरापूर्वी स्थापन झालेल्या आणि जगभरात नावलौकिक संपादन केलेली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था लवकरच एका नव्या स्थापत्यरचनेमुळेही ओळखली जाणार आहे. संस्थेच्या एक एकर जागेच्या मोकळ्या परिसरात खुल्या रंगमंचाची उभारणी करण्यात येत आहे. संस्थेच्या आवारात गेल्या पाऊणशे वर्षांहून अधिक काळ आपली मुळे आणि पारंब्या घट्ट रोवून दिमाखात उभ्या असणाऱ्या डेरेदार वटवृक्षाच्या सान्निध्यात ‘समवशरण’ ही खुल्या रंगमंचाची वास्तू साकारली जात आहे.
प्राच्यविद्येच्या अभ्यासाबरोबरच सकल कलांना सामावून घेणारा भव्य खुला रंगमंच साकारला जावा, अशी संकल्पना भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी मांडली. केवळ संकल्पना मांडूनच ते थांबले नाहीत. तर, या खुल्या रंगमंच उभारणीची आर्थिक जबाबदारी त्यांनी उचलली. खुल्या रंगमंचाची कल्पना सर्वाना पसंत पडली आणि त्यानंतर कामाला सुरुवात करण्यात आली, अशी माहिती संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी दिली.
पटवर्धन म्हणाले, संस्थेच्या आवारात ७५ वर्षांहून अधिक काळ उभ्या असलेल्या वटवृक्षाच्या आसपास एक मंच तयार करून ही खुल्या रंगमंचाची उभारणी केली जात आहे. येथे कोणत्याही भिंती नसतील. कलेच्या अभिव्यक्तीसाठी खुले वातावरण असेल.
रंगमंचाच्या अवतीभवती बसण्यास जागा असेल. या ठिकाणच्या नैसर्गिक उंचसखल जागेचाही कौशल्यपूर्वक वापर करण्यात आला आहे. संस्थेच्या दहा एकर जागेपैकी ही एक एकर मोकळी जागा अनेक वर्षे पडून होती. या रंगमंचाच्या निमित्ताने तिचा सर्जनशील उपयोग होऊ शकेल. येथील भारतीय प्रजातीची ८० झाडे आणि वटवृक्षाच्या पारंब्या आहेत तशाच ठेवून ही वास्तू उभारण्यात येणार आहे.
त्यासाठी प्रवेशसुद्धा वेगळ्या रस्त्याने असेल. रोमन शैलीतील ही वास्तू प्रसिद्ध वास्तुविशारद नचिकेत पटवर्धन साकारत आहेत. व्याख्याने, प्रायोगिक नाटक, छोटेखानी सांगीतिका आणि नृत्याचे कार्यक्रम, परिसंवाद, विद्यार्थ्यांसाठी भाषणे अशा अनेक उपक्रमांसाठी ही वास्तू उपयोगात येऊ शकेल.
‘समवशरण’ म्हणजे काय?
भांडारकर संस्थेतील या खुल्या रंगमंचाचे ‘समवशरण’ असे नामकरण करण्यात येणार आहे. ‘समवशरण’ या शब्दाला जैन तत्त्वज्ञानामध्ये विशेष महत्त्व आहे. र्तीथकरांच्या सभोवती बसून अनेक जण र्तीथकरांचे प्रवचन ऐकतात, त्या परिसराला ‘समवशरण’ असे संबोधिले जाते. या खुल्या रंगमंचाची कल्पना मांडणारे अभय फिरोदिया यांनीच हे नाव सुचविले आहे, असे भूपाल पटवर्धन यांनी सांगितले.
भांडारकर संस्थेच्या आवारातील डेरेदार वटवृक्ष हा संस्थेला भेट देणाऱ्या सर्वाच्याच कुतूहलाचा विषय असतो. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे माजी अध्यक्ष आणि इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे बंधू वै. का. राजवाडे यांनी ४ जानेवारी १९४३ रोजी हे झाड लावले होते. या डेरेदार वटवृक्षाने ७७ वर्षे पूर्ण केली आहेत.
– भूपाल पटवर्धन, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था
