पुणे : वेगाने विकसित होत असलेल्या विद्युत वाहन तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात येत आहे. १ कोटी ६५ लाख खर्च करून ही अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात येत असून, विद्युत वाहनांबाबतच्या मूलभूत रचनेपासून विद्युत वाहनांच्या सुरक्षिततेबाबतचे प्रयोग या प्रयोगशाळेत केले जातील.

 जेएसपीएम- टीएसएसएम शिक्षण संस्था समूक आणि सिनर्जी कंपनीतील कराराअंतर्गत या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात येत आहे. स्वित्र्झलड येथील स्किलसॉनिकस कंपनीचे प्रमुख फ्रान्झ प्रोबस्ट, सिनर्जी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जयंत लिमये, जयवंत शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. रवि जोशी, जेएसपीएम संस्थेचे विश्वस्त हृषीराज सावंत आदींच्या उपस्थितीत नऱ्हे येथील भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू करण्यात आले.  विद्यार्थ्यांना विद्युत वाहनांची मूलभूत माहिती, विद्युत वाहनांना लागणारी साधनसामग्री, दुरुस्ती आणि देखभाल, वाहनांचे चार्जिग तंत्रज्ञान, सुरक्षितता, वाहन क्षेत्रात करिअर करण्याची येऊ घातलेल्या संधींबाबतचे मार्गदर्शन प्रयोगशाळेच्या माध्यमातून केले जाईल. 

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची प्रबळ इच्छाशक्ती ही भारतीय तरुणांमध्ये असल्याने स्वित्र्झलड सरकारने विद्युत वाहन क्षेत्रात भारताला कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने विद्युत वाहन क्षेत्रासाठी आवश्यक जागतिक दर्जाचे प्रशिक्षण या प्रयोगशाळेच्या माध्यमातून दिले जाईल, असे प्रोबस्ट यांनी नमूद केले.