तळजाईच्या जंगलात एका बांधकाम व्यावसायिक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कौस्तुभ सुरेश देशमुख (वय ३३, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काैस्तुभ बांधकाम व्यावसायिक होते. सोमवारी (६ फेब्रुवारी) ते सकाळी घरातून कामासाठी बाहेर पडले. तळजाई टेकडीच्या परिसरातील जंगलात मनोरा (पॅगोडा) आहे. मनोऱ्याच्या परिसरातील एका झाडाला कौस्तुभ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पंधरा मिनिटांत घरी येतो, असे सांगून कौस्तुभ घरातून बाहेर पडले होते. मात्र, रात्री साडेआठपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने मोबाइलवर संपर्क साधला. कौस्तुभ यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे, कुटुंबीयांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
हेही वाचा – पुणे: रिंग रोड सुसाट; ३५०० कोटींच्या कर्जाला शासनाची हमी
हेही वाचा – चिंचवडमधील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे सर्वांत श्रीमंत! ‘इतकी’ आहे मालमत्ता
सहकारनगर पोलिसांंचे पथक तळजाई परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी मनोऱ्याजवळ एक दुचाकी आढळून आली. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून मालकाचा पत्ता शोधला. तेव्हा घरातून बेपत्ता झालेल्या कौस्तुभ यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. कौस्तुभ यांच्यामागे आई-वडील, पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा आहे. नऱ्हे भागात एका गृहप्रकल्पाचे बांधकाम कौस्तुभ यांच्याकडून करण्यात येत होते.