टक्कल पडलेल्या व्यक्तीस शास्त्रीय पद्धतीने केसांचे रोपण करून देण्याची हमी देऊन त्याच्याकडून कोरेगावपार्क येथील होमिओपथिक क्लिनिकमध्ये पैसे घेण्यात आले. मात्र, त्या ग्राहकाला उपचाराचा काहीच फरक न पडल्यामुळे ग्राहक मंचाने या होमिओपथिक क्लिनिकच्या संचालकाला केस रोपणासाठी घेतलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर नुकसान भरपाई आणि दाव्याचा खर्च असा एकूण २६ हजार तीनशे रुपये देण्याचा आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्या गीता घाटगे यांनी दिला.
किरण दत्तात्रय वरुडे (रा. पेंबर, खंडोबाची पाल, ता. कऱ्हाड, जि. सातारा) यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यांच्यावतीने शिवकुमार इंजेकर यांनी मंचाकडे बाजू मांडली. त्यावरून कोरेगाव पार्क येथील होमिओपथिक क्लिनिकच्या संचालक कविता सोनवणे यांना तक्रारदारांना औषधोपचाराचा खर्च १८ हजार तीनशे, शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी पाच हजार आणि तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार असे एकूण २६ हजार ३०० रुपये देण्याचे आदेश दिले.
सोनवणे यांनी एका दैनिकात जाहिरात देऊन टक्कल पडलेल्या व चाई पडलेल्या लोकांना शास्त्रीय पद्धतीने केसांचे रोपण करून गळणारे केस थांबविले जातील, अशी जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीवरून वरुडे हे केस रोपण करण्यासाठी सोनवणे यांच्या क्लिनिकमध्ये गेले. सुरूवातीस प्रवेश शुल्क म्हणून त्यांच्याकडून तीन हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर औषोधपचारासाठी अठरा हजार रुपये घेतले.  मात्र, क्लिनिककडून दिलेल्या औषधांमुळे केसांवर काहीच फरक पडला नाही. त्यामुळे वरुडे यांनी सोनवणे यांना फोनवरून अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोनवणे यांनी त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी सोनवणे यांना वकिलामार्फत नोटीस पाठविली. परंतु त्यालाही त्यांनी उत्तर दिले नाही. सोनवणे यांनी वरुडे यांच्याकडून औषधोपचारासाठी रक्कम स्वीकारलेली आहे. त्यामुळे दोघांमध्ये ग्राहक आणि सेवा पुरवठादार असे नाते निर्माण झालेले आहे. त्यामुळे सोनवणे यांनी औषधोपचारासाठी घेतलेली रक्कम आणि शारीरिक आणि मानसिक खर्च आणि खटल्याचा खर्च मिळावा म्हणून मंचाकडे दावा दाखल केला. या दाव्याच्या सुनावणीला सोनवणे या गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात एकतर्फी आदेश पारीत केला. सोनवणे यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिल्याचे सिद्ध होते. त्यामुळे त्यांनी घेतलेली रक्कम परत करावी, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे त्यांनी एकूण २६ हजार ३०० रुपये वरुडे यांना द्यावेत. सहा आठवडय़ाच्या आत ही रक्कम न दिल्यास तक्रार दाखल झाल्यापासून ती नऊ टक्के व्याज दराने आकारण्याचा अधिकार तक्रारदार यांना राहील, असा आदेश मंचाने दिला.