scorecardresearch

एक डझनच्या आंबा खोक्यांना ग्राहकांची पसंती ; पेटीपेक्षा आंब्यांच्या खोके खरेदीकडे वाढता कल

एक, सव्वा आणि दीड डझनाच्या आंब्यांची खोकी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला असून चार ते सहा डझनाच्या लाकडी पेटीपेक्षा आंब्यांच्या छोटय़ा खोक्यांना ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.

पुणे : एक, सव्वा आणि दीड डझनाच्या आंब्यांची खोकी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला असून चार ते सहा डझनाच्या लाकडी पेटीपेक्षा आंब्यांच्या छोटय़ा खोक्यांना ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. ग्राहकांचा कल विचारात घेऊन कोकणातील कुणकेश्वर, मालवण, देवगड, रत्नागिरीसह वेगवेगळय़ा भागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून घाऊक बाजारात छोटय़ा खोक्यातून आंबा पाठविण्यात येत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात आंब्याचे दर चढे आहेत. सध्या बाजारात आंब्यांची आवक कमी होत आहे. आवक वाढली तर दरात घट होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी आंब्यांची पेटी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल जास्त होता. एकत्र कुटुंबपद्धतीत पूर्वी उन्हाळय़ाची सुट्टी लागल्यानंतर आंब्यांची पेटी खरेदी केली जात असे. आता परिस्थिती बदलली असून कुटुंबाचा आकार छोटा झाला आहे. त्यामुळे ग्राहकांचा पेटीपेक्षा आंब्यांची खोकी खरेदी करण्याकडे कल वाढला आहे, असे निरीक्षण श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी करण जाधव यांनी नोंदविले.  

एक डझन, सव्वा डझन, दीड डझनाची खोकी बाजारात उपलब्ध आहेत. एक डझनाच्या खोक्याचा दर १३०० ते १४००  रुपये असा आहे. एक डझनाच्या खोक्यातील आंब्याचे फळ आकाराने मोठे आहे. या तुलनेत सव्वा डझन आणि दीड डझनाच्या खोक्यातील आंबे आकाराने लहान असतात. सव्वा डझनाच्या खोक्याचा दर १२०० ते १३०० रुपये आणि दीड डझनाच्या खोक्याचा दर ११०० रुपये असा आहे. कच्च्या हापूसच्या पेटीचे दर (चार ते सहा डझन) तीन ते चार हजार रुपये दरम्यान आहेत. तयार हापूसच्या पेटीचा दर (पाच ते दहा डझन) चार ते सात हजार रुपये दरम्यान आहेत, असे जाधव यांनी सांगितले.

हापूस आंब्यांचा हंगाम १५ जूनपर्यंत

वातावरणातील बदलामुळे कोकणातील आंबा लागवडीवर परिणाम झाला. फळधारणाही कमी झाली. कोकणात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी परिस्थितीचा अंदाज घेऊन आंबा विक्रीस पाठवीत आहेत. पुढील आठवडय़ात आंब्यांची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर दरात काहीशी घट होईल. यंदा पाऊस उशिरा आला तर, हापूस आंब्यांचा हंगाम १५ जूनपर्यंत सुरू राहील, असे मार्केट यार्डातील आंबा व्यापारी अरिवद मोरे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Consumer preference dozen mango boxes growing trend buying mango boxes ysh

ताज्या बातम्या