पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या बाजूला शनिवारी सायंकाळी अमृतांजन पुलाजवळ कंटेनरच्या केबिनला शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीत कंटेनरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली असून वेळीच खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याकडे येणारी वाहतूक थांबविल्यामुळे पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरील एक ते दीड तास वाहतूक थांबविण्यात आली. रात्री सव्वासातनंतर एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली. यामुळे रस्त्यावर चार ते पाच किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या
   खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे येत असताना अमृतांजन पुलामधून बाहेर पडताच एका कंटनेरच्या केबिनला अचानक आग लागली. काही वेळात आग भडकल्याने खबरदारीचा उपाय म्हणून द्रुतगती मार्गावरील वाहतूकथांबविण्यात आली. यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या आयआरबी कंपनीच्या आग्निशमन गाडय़ांनी केबिनला लागलेली आग आटोक्यात आणली. सायंकाळची वेळ असल्याने पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यत वाहनांच्या रांगा गेल्या होत्या. रात्री सव्वासातच्या सुमारास आग पूर्णपणे विझवत एकेरी मार्गाने वाहतुक सुरू करण्यात आली. यामुळे या रस्त्यावर एक ते दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.