पिंपरी : पिंपरीतील मोरवाडी चौकात पुणे-मुंबई महामार्गावरील समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास एक कंटेनर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. सकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
एक कंटेनर निगडीहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. मुंबई-पुणे महामार्गावरील समतल विलगका खालून जात असताना कंटेनर चालकाला समतल विलगकाच्या उंचीचा अंदाज आला नाही. त्याने समतल विलगकामधून कंटेनर घुसवला. मात्र, उंची जास्त असल्यामुळे कंटेनर समतल विलगकामध्ये अडकला. कंटेनर पुन्हा मागे घेण्याऐवजी चालकाने त्याला पुन्हा समतल विलगकामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कंटेनर पूर्णपणे अडकला गेला. याचा परिणाम मोरवाडी चौकातून नाशिक फाटा तसेच चिंचवडगावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. काही मिनिटांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. समतल विलगकामध्ये वाहतूक कोंडी झाल्याने याचा परिणाम महामार्गावरील सेवा रस्त्यावरही झाला. सेवा रस्त्यावरही वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने अडकलेला कंटेनर बाजूला काढण्याचे काम हाती घेण्यात आले. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली. मात्र, समतल विलगकामधील रस्त्यासह मार्गावरील सेवा रस्त्यावरही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना तसेच, शाळा महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटण्यास सुमारे तीन तास लागले. या घटनेमुळे समतल विलगका खालील उंची मर्यादा आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
निगडीहून पुण्याच्या दिशेने जाणारा कंटेनर सकाळी नऊच्या सुमारास ग्रेड सेपरेटरमध्ये अडकला. सुमारे दोन तासानंतर क्रेनच्या साह्याने कंटेनर बाहेर काढण्यात आला. साडेचार मीटर पेक्षा उंच वाहनांनी समतल विलगकामध्ये प्रवेश करू नये, अशा आशयाचे सूचनाफलक महापालिकेच्या वतीने लावण्यात आले आहेत. मात्र, बाहेरील राज्यातून येणारे अवजड वाहनचालक या सूचना फलकाकडे दुर्लक्ष करतात आणि आपली वाहने समतल विलगकामध्ये घुसवतात, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.
समतल विलगकामध्ये वारंवार वाहने अडकतात. महापालिकेने समतल विलगकामध्ये प्रवेश करण्याच्या काही अंतरावर उभारलेल्या ‘हाईट बॅरीयर’ची उंची वाढवावी. जेणेकरून जास्त उंची असलेली वाहने समतल विलगकामध्ये येणार नाहीत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील म्हणाले.

