पुणे: वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शिवणे ते खराडी हा नदीपात्रातून रस्ता तयार करण्याचे काम महापालिकेने सुरू केले होते. यासाठी २०११ मध्ये निविदा प्रक्रिया करून ३५० कोटी रुपयांच्या कामाला मान्यता दिली होती. मात्र, या रस्त्यासाठी आवश्यक ते भूसंपादन न झाल्याने रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने महापालिकेकडे ७९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. हा प्रस्ताव मान्य व्हावा, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असून, याला मान्यता मिळाल्यास हा भुर्दंड महापालिकेला सहन करावा लागणार आहे.
हा रस्ता अनेक ठिकाणी निळ्या पूररेषेत आला आहे. तर, काही ठिकाणी जागा मालकांनी आपल्या इतर जागेवरील आरक्षणे उठवून देण्याची मागणी महापालिकेकडे केली. त्यामुळे १४ वर्षांनंतरही या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे चार वर्षांपूर्वी २०२१ मध्ये रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराने काम करण्यास असमर्थता दाखवून महापालिकेकडून आतापर्यंत केेलेल्या कामाचे अंतिम बिलदेखील घेतले. तसेच, महापालिकेने भूसंपादन करून न दिल्याने या कामात आर्थिक नुकसान झाल्याचे सांगून ठेकेदाराने महापालिकडे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे.
नुकसान भरपाईपोटी ७९ कोटी रुपयांचा दावा संबधित ठेकेदाराने महापालिकेकडे केला आहे. हे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी महापालिकेत जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. या दाव्यासाठी जानेवारी २०२५ मध्येच लवादाची नेमणूक करून त्यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे. आता लवादासाठी महापालिका आणि संबंधित ठेकेदार यांच्यात करार करण्याचा प्रस्तावही स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आलेला आहे.
रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून नुकसानभरपाई मागण्यात आली आहे. मात्र, ती देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. लवादाने नुकसानभरपाई द्यावी, असा निर्णय दिला, तरी तो निर्णय महापालिकेला बंधनकारक नाही. पालिकेचे नुकसान होत असल्यास ठेकेदाराला पैसे दिले जाणार नाहीत. – डाॅ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका