रेल्वे गाड्यांमध्ये एलपीजी सिलिंडरचा वापर करण्यास मनाई आहे. असे असतानाही रेल्वे गाडीच्या पँट्रीत एलपीजी सिलिंडरचा बेकायदा पद्धतीने वापर करून खाद्यपदार्थ बनविले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रेल्वेच्या तपासणी पथकाकडून गाड्यांतील पँट्रीची अचानक तपासणी केली जाते. याच पद्धतीने जम्मू तावी-पुणे झेलम एक्स्प्रेसच्या पँट्रीची तपासणी करण्यात आली. त्या वेळी ठेकेदाराकडून बेकायदा पद्धतीने एलपीजीचा वापर करून खाद्यपदार्थ बनवले जात असल्याचे निदर्शनास आले. पँट्रीत एलपीजी सिलिंडर आणि शेगडी आढळून आली. त्याचबरोबर अनधिकृत पाण्याच्या बाटल्यांचा साठाही सापडला. या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.




हेही वाचा >>> पुणे: भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू; दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी
रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रेल्वेने आयआरसीटीसीला हा प्रकार कळवला आहे. ही कारवाई मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली खानपान निरीक्षक ए. आर. अर्डे आणि निर्पिन बिस्वास यांनी केली.
एलपीजी वापरास मनाई का? रेल्वेत आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी पँट्री कारमध्ये एलपीजी सिलिंडरचा वापर करण्यास मनाई आहे. रेल्वे मंडळाने याबाबत इंडियन केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (आयआरसीटीसी) निर्देश दिले होते. त्यानंतर आयआरसीटीसीने याबाबतच्या सूचना विभागीय रेल्वेंना दिल्या होत्या. यानुसार गाड्यांतील पँट्रीमध्ये एलपीजी सिलिंडर वापरू नये, असे सांगण्यात आले होते. एलपीजीऐवजी इंडक्शन सिस्टीमचा वापर करण्याचीही सूचना करण्यात आली होती.