scorecardresearch

गेले सन्मानित होण्याचे राहुनी..

प्रकाशन क्षेत्रातील योगदानाबद्दल अरुण जाखडे यांचा उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सन्मान होणार होता.

अरुण जाखडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते झाले होते.

पुणे : प्रकाशन क्षेत्रातील योगदानाबद्दल अरुण जाखडे यांचा उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सन्मान होणार होता. पण, जाखडे यांच्या आकस्मिक निधनामुळे ‘गेले सन्मानित होण्याचे राहुनी’ असे म्हणण्याची वेळ साहित्यप्रेमींवर आली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दरवर्षी एका मान्यवर साहित्यिकासह एका प्रकाशकाचा सन्मान केला जातो. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या ९४ व्या साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ लेखक मनोहर शहाणे आणि ‘ग्रंथाली’ वाङ्मयीन चळवळीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सन्मान करण्यात आला होता. आता उदगीर येथे एप्रिलमध्ये होत असलेल्या ९५ व्या साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे यांचा सन्मान करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला होता.  उदगीर येथील साहित्य संमेलनामध्ये अरुण जाखडे यांचा सन्मान व्हावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने आग्रह धरला. या प्रस्तावाला साहित्य महामंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला. त्यामुळे जाखडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. हा सत्कार स्वीकारण्यास जाखडे यांनी मंजुरी दिली होती. मात्र, जाखडे यांच्या निधनामुळे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सन्मानित होण्याचा योग काही जुळून आला नाही, याची रुखरुख वाटते, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Contribution field publishing days honored ysh

ताज्या बातम्या