पिंपरी- चिंचवड : वादग्रस्त आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातील थर्मोव्हेरीटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित कंपनीने २ लाख ७२ हजारांचा कर अद्यापही भरला नाही. आधीच जप्तीची कारवाई केलेल्या कंपनीचा लिलाव होऊ शकतो, अशी माहिती करसंकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी दिली आहे. आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर या वेगवेगळ्या वादग्रस्त प्रकरणामुळे अडचणीत आल्या आहेत. पूजा खेडकर यांनी पिंपरी- चिंचवड शहरातील थर्मोव्हेरिटा कंपनीचा पत्ता देऊन वायसीएम रुग्णालयातून सात टक्के दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिलं होतं. या रेशन कार्डवर याच कंपनीचा पत्ता आहे. या प्रकरणात या कंपनीवर जप्तीची नोटीस आधीच देण्यात आली असून आता लिलाव होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा-बनावट प्रमाणपत्राबाबत राज्यपालांची स्पष्ट भूमिका… म्हणाले, “घेणारे, देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई…” एप्रिल २०२२ पर्यंत संबंधित कंपनीने नियमित कर भरलेला आहे. परंतु, त्यानंतर दोन वर्षाचा २ लाख ७२ हजार कर थकीत आहे. याबाबत मार्च महिन्यात जप्तीपूर्व नोटीस दिलेली आहे. सध्या अधिपत्र बजावण्यात आलं असून त्यांची मालमत्ता जप्त केलेली आहे. अधिपत्र बजावण्यात आल्यानंतर २१ दिवसाच्या आत कर भरावा लागतो. अन्यथा संबंधित मालमत्तेचा लिलाव किंवा विक्रीला काढण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या तरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातील थर्मोव्हेरिटा कंपनीवर लिलावाची टांगती तलवार आहे.