लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कबाब वेळेत न दिल्याने झालेल्या वादातून हॉटेल मालकाकडून ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना लष्कर भागात घडली. याप्रकरणी हॉटेल मालकासह दोघांविरुद्ध लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
जाकीर हुसेन पठाण (वय ४०, रा. एच. एम. रॉयल सोसयाटी, कोंढवा बुद्रुक) असे जखमी झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. याप्रकरणी हॉटेल मालक शाहबाज नवाब शेख (वय ४४, रा. रेडियन पॅरेडाईज बिल्डींग, वानवडी), कर्मचारी मोहंमद अयाज शेख (वय २४, रा. जमादार गल्ली, मंचर, आंबेगाव ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जाकीर पठाण यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आणखी वाचा-प्रभाग पद्धतीचा राजकीय खेळ
लष्कर भागातील शाही दावत हॉटेलमध्ये पठाण गेले होते. त्यांनी चिकन कबाब मागविले. पठाण कबाब घेऊन घरी निघाले होते. कबाब तयार होण्यास उशीर झाल्याने त्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. या कारणावरुन हॉटेल मालक शाहबाज शेख आणि कर्मचारी मोहंमद शेख यांच्याशी पठाण यांचा वाद झाला. ‘इसका क्या ऑर्डर है, जल्दीसे दे दो, वापीस हॉटेल मत आने दो’, असे शाहबाजने त्याला सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. शाहबाज, मोहंमद यांनी पठाण याला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात कठीण वस्तू मारली. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अशा’ होणार लढती; शिवसेनेच्या (ठाकरे) पदरी निराशा
नाश्ता करताना झालेल्या वादातून हातोडीने मारहाण
नाश्ता करताना ताटलीत हात घातल्याने झालेल्या वादातून तरुणाला हातोडीने मारहाण करण्यात आल्याची घटना नरवीर तानाजीवाडी (वाकडेवाडी) परिसरात घडली. याप्रकरणी साईनाथ भुगप्पा ब्यागरी (रा.अनुतेज अथर्व बिल्डींग, कृषी भवनसमोर, शिवाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अमित बापू जाधव (वय ३८, रा. पीएमसी वसाहत, वाकडेवाडी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ब्यागरी आणि जाधव ओळखीचे आहेत. ब्यागरी नरवीर तानाजीवाडी परिसरातील एका खाद्यपदार्थ विक्री गाडीवर नाश्ता करत होता. त्यावेळी जाधवने त्याच्या ताटलीत हात घातला. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादातून त्याने जाधवला हातोडीने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.