पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दुबार विक्रीमुळे कोथिंबिरीचे दर वाढल्याच्या तक्रारी आल्यानंतर बाजार समितीने मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. बाजार आवारातील चौघांवर कारवाई करून बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी कोथिंबिरीच्या ३३५ जुड्या जप्त केल्या.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात शेतमालाची विक्री केली जाते. काहीजण दुबार विक्री करत असल्याने बाजार आवारात शेतमालाचे दर वाढतात. गेल्या पंधरा दिवसांपासून कोथिंबिरीसह सर्व पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. पालेभाज्यांच्या दरातील तेजीचा फायदा घेऊन काहीजण घाऊक बाजारात पुन्हा कोथिंबिरीची विक्री करत असल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे करण्यात आल्या होत्या. बाजार समितीने मंगळवारपासून दुबार विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली असून, पहिल्या दिवशी कोथिंबिरीच्या ३३५ जुड्या जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या कोथिंबिरीचा पुन्हा लिलाव करण्यात आला.

हेही वाचा – पिंपरी: पोलीस शिपाई पदाच्या २६२ जागांसाठी किती अर्ज? आजपासून भरतीप्रक्रिया

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांचा आदेश, फळ-भाजीपाला विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे यांच्या सूचनेनुसार गटप्रमुख नितीन चौरे, दादासाहेब वरघडे, दीपक धोपटे, संतोष कुंभारकर आणि पथकाने ही कारवाई केली. कडक ऊन, पूर्वमोसमी पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दरवाढ झाली आहे. कोथिंबिरीला मोठी मागणी असते. मागणीच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक कमी होत असल्याने घाऊक बाजारात एका जुडीचा दर ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला ५० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. दरवाढीचा फायदा काही जण घेत असून, शेतकऱ्यांना कमी दर मिळाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर कारवाई करण्यात आली. यापुढील काळात दुबार विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी सांगितले.

हेही वाचा – सावधान! चहातून गुंगीचे औषध देऊन महिलांचे दागिने लुबाडतेय एक महिला

‘दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे’

बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर कोथिंबिरीची दुबार विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. घाऊक बाजारातील अडत्यांनी किरकोळ विक्रेत्यांना शेतमालाची विक्री न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घाऊक बाजारातील अडत्याने बाजार आवारात किरकोळ विक्रेत्यांना शेतमालाची विक्री केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा बाजार समितीचे सचिव डाॅ. राजाराम धोंडकर यांनी दिला. शेतमालाच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळायला हवा. दर वर्षी जून-जुलै महिन्यात घाऊक बाजारात दुबार विक्रीच्या तक्रारी येतात, असे त्यांनी नमूद केले.