पुणे : जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कॉर्निंग इनकॉर्पोरेटेड कंपनीने पुण्यात गुंतवणूक केली आहे. ग्लास डिस्प्ले आणि ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनसह इतर क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. कंपनीने पुण्यात नवीन ऑप्टिकल कनेक्टिव्हिटी उत्पादन सुविधेचे भूमिपूजने केले. या सुविधेचे उद्घाटन या वर्षाच्या उत्तरार्धात केले जाणार आहे.

कॉर्निंग इनकॉर्पोरेटेड कंपनीच्या नवीन सुविधेत वेगळ्या प्रकारची ऑप्टिकल कनेक्टिव्हिटी उत्पादने तयार केली जाणार आहेत. ही उत्पादने प्रामुख्याने हायपरस्केल आणि कृत्रिम प्रज्ञा म्हणजेच एआय-आधारित डेटा सेंटरसाठी उपयुक्त ठरतील. गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून भारतातील ऑप्टिकल कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्सची वाढती मागणी पूर्ण करण्यात कॉर्निंगने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ही नवीन सुविधा भारताच्या वाढत्या डेटा सेंटर बाजारपेठेले पाठबळ देईल. तसेच, भारतातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देईल. कंपनीकडून अॅपलच्या आयफोनसह इतर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी गोरिला ग्लास डिस्प्ले तयार केले जातात. या ग्लासच्या निर्मितीसाठीही कंपनीने तमिळनाडू राज्यात उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे.

कॉर्निंग इनकॉर्पोरेटेड कंपनीने पुण्यात २०१२ मध्ये ऑप्टिकल फायबर उत्पादन प्रकल्प सुरू केला. आता नवीन सुविधा उभारण्याचे पाऊल कंपनीने उचलले आहे. यामुळे कॉर्निंगच्या उत्पादन क्षमतेचा विस्तार होणार आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या पुढील लाटेला सक्षम करण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. या नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन २०२६ च्या उत्तरार्धात केले जाईल.

विस्ताराचे पाऊल

याबाबत कंपनीचे आशिया प्रशांत विक्री विभागाचे उपाध्यक्ष विल्यम वॉलेस म्हणाले की, नवीन उत्पादन सुविधेचे भूमिपूजन भविष्यातील कनेक्टिव्हिटीच्या गरजा पूर्ण करेल. भारत तसेच इतर देशांतील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विस्ताराला पाठबळ देण्याची कॉर्निंगची कटिबद्धता यातून दिसून येते. ऑप्टिकल फायबर उत्पादनापासून हायपरस्केल डेटा सेंटर तसेच कृत्रिम प्रज्ञा-आधारित कनेक्टिव्हिटी उपायांना सहाय्य देण्यापर्यंत कामकाजाचा विस्तार करण्याच्या दिशेने ही सुविधा एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

दीर्घकालीन दृष्टिकोन

कॉर्निंग इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर पिल्लई म्हणाले की, ही नवीन सुविधा शेकडो रोजगार निर्माण करण्यास मदत करेल. हा प्रकल्प या देशासाठी आणि आमच्या ग्राहकांसाठी कॉर्निंगची दृढ वचनबद्धता दर्शवतो. तसेच भारतातील निर्मिती क्षेत्राच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण बनण्याच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाला पाठिंबा देतो.