पुणे कृती दलाचा निर्वाळा

पुणे : करोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिकाधिक लहान मुले बाधित होतील, असे वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झालेले नाही. मात्र, प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. अशाप्रकारे लहान मुले बाधित झाल्यास शून्य ते अठरा वयोगटातील विविध आजारांची मुलेच अतिजोखमीच्या श्रेणीत असतील, असा निर्वाळा पुणे जिल्हा कृती दलाने सोमवारी दिला.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्हा कृती दल नियुक्त केले आहे. या कृती दलाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत कृती दलाने ही माहिती दिली. कृती दलाच्या अध्यक्ष डॉ. आरती किणीकर म्हणाल्या, ‘तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होतील, असे सिद्ध झालेले नाही. मात्र, संभाव्य संसर्गात रक्तक्षय (अॅतनिमिया), कु पोषण, स्थूलता, हृदय व यकृतविकार, रक्ताचे आजार, तसेच काही मुलांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची समस्या देखील असते. अशी मुले अतिजोखमीच्या श्रेणीत असतील. लहान मुले बाधित झाल्यास बहुतांश वेळा लक्षणेविरहित असतात. त्यामुळे मुलांना ताप आल्यास घरगुती उपचार करण्यापेक्षा पालकांनी बालरोगतज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शून्य ते अठरा वयोगटातील बाधित मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची फारशी गरज भासली नसल्याचे दिसून आले आहे. या वयोगटातील बाधित मुलांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा पुरेसा साठा के ला आहे.’

कृती दलाचे सदस्य डॉ. संजय नातू म्हणाले, ‘महाराष्ट्र कृती दलाने लहान मुलांवर उपचार करण्यासाठीची नियमावली तयार के ली आहे. याबाबत शहरासह जिल्ह्य़ातील आशा सेविका, परिचारिकांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. बाधित लहान मुलांवर उपचार करताना काय काळजी घ्यावी याबाबतचे हे प्रशिक्षण होते. इन्फ्लुएन्झाची लस लहान मुलांना इतर आजारांपासून संरक्षण देते. त्यामुळे ही लस लहान मुलांना दिल्याने करोना संसर्गापासून संरक्षण होत नाही.’

मूकबधिर मुलांसाठी पारदर्शक मुखपट्टी

मूकबधीर मुलांसाठी पारदर्शक मुखपट्टी म्हणजेच तोंडाच्या ठिकाणी प्लास्टिकची पट्टी असणाऱ्या मुखपट्टीचे वाटप करण्यात येणार आहे किं वा अशाप्रकारच्या मुखपट्टय़ा बाजारात उपलब्ध होतील. याबाबत उच्च न्यायालयानेही आदेश दिले आहेत. मूकबधीर मुलांना के वळ ओठांच्या हालचालीची भाषा कळते, त्यामुळे अशाप्रकारची मुखपट्टी लवकरच उपलब्ध होईल, असेही डॉ. किणीकर यांनी सांगितले.