संसर्ग दर पाच टक्क्यांखाली आल्याने दिलासा

पुणे : राज्यातील करोना संसर्गाच्या महासाथीचा केंद्रबिंदू राहिलेल्या पुणे शहरात संसर्गाचा दर पाच टक्क्यांखाली आल्याने काहीसे दिलासादायक वातावरण आहे. ३० जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीत करोना संसर्गाचा दर दररोज पाच टक्क्यांहून कमी राहिला आहे. हे चित्र अत्यंत सकारात्मक आहे, तरी ही घट कायम राहावी यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियम पाळत यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करत आहेत.

३० जुलै ते पाच ऑगस्ट या आठवडाभराच्या कालावधीत पुणे शहरात दररोज पाच ते १० हजारांच्या घरात करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दर १०० चाचण्यांमागे आढळणाऱ्या बाधित रुग्णांचे प्रमाण, म्हणजेच संसर्गाचा दर या आठवडय़ात सातत्याने पाच टक्क्यांहून कमी राहिल्याचे दिसून आले आहे. मार्च २०२० पासून पुणे शहरात करोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. मार्च २०२१ पासून शहरातील रुग्णसंख्येत वाढ सुरू झाली आणि या वाढीचे दुसऱ्या लाटेत रूपांतर झाले.

तब्बल महिनाभर तीव्र स्वरूपात रुग्णवाढ झाल्यानंतर एप्रिल २०२१ पासून दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या काहीशी ओसरण्यास सुरुवात झाली, तरी संसर्गाचा दर २५ टक्के  एवढा होता. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत त्यात घट होऊन तो २० टक्के  पर्यंत खाली आला. मे महिन्याच्या अखेरीस मात्र शहरातील संसर्गाचा दर वेगाने कमी होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जून महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या दर सातत्याने सहा ते आठ टक्के  एवढा खाली आला. जुलै महिन्यात संसर्गाचा दर सातत्याने पाच टक्के  आणि त्याखाली राहिल्याने साथीची तीव्रता आटोक्यात आली आहे.

काही प्रमाणात निर्बंध ठेवणे आवश्यकच

वातानुकू लित रेस्टॉरंट, कार्यालये यांना परवानगी देऊ नये. सार्वजनिक सण-उत्सवांबाबत मागील वर्षीचेच निर्बंध कायम ठेवावेत. लसीकरणाबाबत कोणालाही सहानुभूती न दाखवता लस घेण्याची सक्तीच के ली जावी. सध्या रुग्णसंख्येत दिसणारी घट अशीच कायम ठेवायची असेल, तर काही प्रमाणात निर्बंध ठेवावेच लागतील. ज्या देशांमध्ये ७० टक्के  लसीकरण झाले आहे, त्या देशांमध्येही साथरोगाचा चढता आलेख आपण पाहत आहोत. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून, लस घेऊन आरोग्य यंत्रणांना, प्रशासनाला सहकार्य के ले तरच  निर्बंध शिथिल करणे शक्य आहे आणि योग्य आहे, असे मत राज्याचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त के ले.

शहरातील संसर्गाची परिस्थिती

तारीख    चाचण्यांची संख्या    रुग्णसंख्या     संसर्गाचा दर

३० जुलै        ६९७०                  २३६              ३.३८

३१ जुलै        ८४५०                  २६०              ३.०७

१ ऑगस्ट      ६६१७                 २५६              ३.८६

२ ऑगस्ट      ७२००                 १४२              १.९७

३ ऑगस्ट      ५४५३                 २३७              ४.३४

४ ऑगस्ट      ८३१२                २४९               २.९९

५ ऑगस्ट      ८४६९                २४४               २.८८