scorecardresearch

ओमायक्रॉनबाबत गाफीलपणा नको!

ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा सौम्य असला तरी विषाणू म्हणून तो सौम्य नाही. ओमायक्रॉनचा संसर्ग असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणविरहित रुग्ण, सौम्य, गंभीर लक्षणे आणि मृत्यू असे सर्व प्रकार पहाण्यात येत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांचे आवाहन; लसीकरण न झालेले, ज्येष्ठांना संसर्ग जोखमीचा

पुणे : ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा सौम्य असला तरी विषाणू म्हणून तो सौम्य नाही. ओमायक्रॉनचा संसर्ग असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणविरहित रुग्ण, सौम्य, गंभीर लक्षणे आणि मृत्यू असे सर्व प्रकार पहाण्यात येत आहेत. त्यामुळे लसीकरण न झालेले, वय आणि इतर व्याधी असलेल्या नागरिकांनी ओमायक्रॉनबाबत गाफील न राहण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ डॉ. मारिया व्हॅन कार्कोव्ह यांनी सर्व देशांना याबाबत आवाहन केले आहे. डॉ. मारिया व्हॅन कार्कोव्ह म्हणाल्या,की करोना संसर्गाच्या इतर उत्परिवर्तनांच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या वाढीचा वेग प्रचंड आहे. संसर्गाच्या बाबत तो डेल्टालाही जगभर मागे टाकत आहे. त्यामुळे जोखीम गटातील रुग्णांना त्याचा संसर्ग होऊन त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होण्याचा धोकाही मोठा आहे. तो कमी करण्यासाठी संसर्गाची शक्यता कमी करणे आवश्यक आहे. लसीकरण हा संसर्ग आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत टाळण्याचा प्रभावी उपाय आहे, मात्र लसीकरण झाले असेल तरी मुखपट्टीचा वापर, गर्दी टाळणे, अंतर राखणे आणि हातांची स्वच्छता या बाबी पाळणे अत्यावश्यक आहेत. ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी, लसीकरण न झालेले, ज्येष्ठ नागरिक आणि रक्तदाब, मधुमेह, श्वसनविकार, हृदयविकार किंवा इतर सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये ओमिक्रॉनमधून निर्माण होणारी संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी त्याची संसर्ग साखळी तोडणे आवश्यक आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दीर्घकाळपर्यंत प्रकृतीच्या अनेक तक्रारी दिसून आल्या. त्यांना लाँग कोविड असे म्हटले जाते. ओमायक्रॉनमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये लाँग कोविड दिसतो किंवा नाही याची माहिती अद्याप हाती आलेली नसल्यामुळेही ओमायक्रॉनबाबत गाफील राहणे योग्य नसल्याचे डॉ. मारियी व्हॅन कार्कोव्ह यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona pateints who scientists omicron ysh

ताज्या बातम्या