दिवसभरात ८८९ रुग्णांची नोंद

पुणे : महाराष्ट्रात सोमवारी दिवसभरात करोनाच्या ८८९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. करोना संसर्गाच्या संकटाने थैमान घालण्यास सुरुवात केली, त्यानंतर प्रथमच राज्यात एकाच दिवशी नोंदवण्यात आलेली ही नीचांकी रुग्णसंख्या आहे. एका बाजूला राज्यातील करोना प्रतिबंधात्मक लसीकरण समाधानकारक वेग घेत असतानाच रुग्णसंख्येतील ही घट दिलासादायक ठरत आहे.

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये सोमवारी आढळलेल्या नवीन रुग्णांची संख्या केवळ एक अंकी आहे. सोमवारी राज्यात १२ मृत्यू नोंदवण्यात आले, मात्र मुंबई, ठाणे, पुणे आणि रत्नागिरी सोडल्यास उर्वरित राज्यात एकाही करोना मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे दिवाळीच्या आगमनापूर्वी राज्यातील करोना संसर्गातील लक्षणीय घट उत्साहवर्धक आहे. राज्यात सद्यस्थितीत तब्बल २३ हजार सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत ९७.४७ टक्के रुग्ण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत.

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, की मार्च २०२० मध्ये पुणे शहरात राज्यातील पहिल्या करोना रुग्णाची नोंद झाली. त्यानंतर साधारण मे २०२० पर्यंत करोना संसर्गाचे राज्यातील चित्र सौम्य म्हणावे असेच होते. मात्र मे महिन्यापासून रुग्णसंख्येत प्रचंड वाढ दिसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पहिली लाट, तिचा आलेख स्थिरावून काहीसा दिलासा मिळतोय असे वाटत असतानाच पहिल्या लाटेहून कितीतरी गंभीर दुसरी लाट राज्याने अनुभवली.

मे २०२० पूर्वी राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात होती. त्यानंतर रुग्णसंख्या, सक्रिय रुग्ण, मृतांची संख्या यांचा अत्यंत गंभीर चढता आलेख आपण पाहिला. मे २०२० नंतर प्रथमच राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या ८८९ पर्यंत नियंत्रणात आलेली सोमवारी पाहायला मिळाली. कठोर र्निबध ते र्निबध उठले तरी असलेला तणाव अशा विविध टप्प्यांतून आपण जात आहोत. त्या पाश्र्वभूमीवर ही घट दिलासादायक आहे. मुखपट्टी, स्वच्छता, अंतर राखणे आणि लसीकरण ही खबरदारी पुढील काही काळापर्यंत घेत राहणे आवश्यकच आहे, असेही डॉ. आवटे म्हणाले.