पुणे/ पिंपरी : करोनाच्या दीर्घकाळ र्निबधांनंतर रविवारपासून (१५ ऑगस्ट) पुणे आणि पिंपरीतील व्यावसायिकांना व्यवसायाचे स्वातंत्र्य मिळणार आहे. नव्या नियमांनुसार करोना प्रतिबंधक उपाययोजना करून दुकाने, मॉल आणि उपाहारगृहे आठवडय़ाचे सर्व दिवस रात्री दहापर्यंत खुली राहणार असून चित्रपटगृहे, नाटय़गृहे आणि मंदिरे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहतील.

राज्य शासनाच्या निर्देशांनुसार पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शनिवारी सुधारित आदेश जारी केले.

दुकाने, उपाहारगृहे, मॉल आणि मंगल कार्यालयांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण होणे बंधनकारक असेल. उपाहारगृहे आणि बार रात्री दहा वाजेपर्यंत आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. पार्सलसेवा २४ तास सुरू राहील. प्रतीक्षा काळात मुखपट्टी बंधनकारक राहील. मॉलमध्ये प्रवेश करताना ग्राहकांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

इनडोअर खेळांसाठी खेळाडू, कर्मचारी व व्यवस्थापकांचे लसीकरण पूर्ण होऊ न १४ दिवस झालेले असणे बंधनकारक आहे. बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅ श, पॅरललबार, मलखांब या खेळांसाठी केवळ दोनच खेळाडूंना परवानगी असेल. सर्व जिम, योग केंद्र, सलून-स्पा ५० टक्के क्षमतेने रात्री दहापर्यंत सुरू ठेवता येतील. सर्व मैदाने, उद्याने नियमित वेळेत सुरू राहतील. विवाह सोहळ्यासाठी खुले कार्यालय, लॉनमध्ये क्षमतेच्या निम्मी तर जास्तीत जास्त दोनशे, बंदिस्त कार्यालय अथवा उपाहारगृहांसाठी क्षमतेच्या निम्मी तर जास्तीत जास्त शंभर इतकीच उपस्थित बंधनकारक राहील. राजकीय, सामाजिक कार्यक्रम तसेच प्रचार सभा, फेरी, मोर्चे यांना मनाई असेही आदेशात म्हटले आहे.

खासगी कार्यालये २४ तास सुरू

सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापकांचे लसीकरण पूर्ण झालेल्या कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता येतील. खासगी कार्यालये २४ तास सुरू ठेवता येतील. मात्र, एका सत्रात एकूण कर्मचारी संख्या २५ टक्कय़ांपर्यंतच मर्यादित असेल. गर्दी टाळण्यासाठी विविध सत्रांमध्ये कर्मचाऱ्यांना बोलवावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लोकल प्रवासाला परवानगी

आरोग्य तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच करोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस झालेल्या नागरिकांनाच आवश्यक प्रमाणपत्र आणि ओळखपत्रासह लोकल प्रवास करता येईल. मात्र, शनिवारी उशिरापर्यंत लोकल सुरू करण्याबाबत कोणतेही आदेश आलेले नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.