पुणे शहरात आज(सोमवार) दिवसभरात ३५१ नवे करोनाबाधित आढळले असून, १ लाख ५४ हजार ५८१ एवढी एकूण रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर ३ हजार ८४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ९५० रुग्णांची ठीक झाल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत १ लाख ३८ हजार ४५२ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

देशभरासह राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. करोनाबाधितांची संख्येतही घट होत आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट आहे. तर, १६५ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात आज ७ हजार ८९ नवे करोनाबाधित आढळले असून, १५ हजार ६५६ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८३.४९ टक्क्यांवर पोहचला आहे.

राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १५ लाख ३५ हजार ३१५ वर पोहचली आहे. यामध्ये २ लाख १२ हजार ४३९ अॅक्टिव केसेस, करोनामुक्त झालेले १२ लाख ८१ हजार ८९६ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४० हजार ५१४ जणांच्या संख्येचा समावेश आहे.